मुंबई प्रतिनिधी :
दि. १४ ऑगस्ट २०२४
ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प.श्री. संजय महाराज पाचपोर यांना यंदाचा ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार जाहीर झाला आहे. ह.भ.प.श्री. संजय महाराज पाचपोर यांचे समाजकार्य मोठे आहे. आपल्या सुश्राव्य कीर्तनातून नेहमीच ते लोकजागृतीचे तसेच धर्मप्रसाराचे काम परिणामकारकतेने करत असतात. सामाजिक भान ठेऊन आपल्या कथाकीर्तंनांद्वारे ते धर्मप्रचाराचे काम करतातच शिवाय त्यांचे इतर सामाजिक क्षेत्रांतील कामही लक्षणीय आहे.
कथा-कीर्तनातून धर्मप्रचारासोबतच १८००० पेक्षा जास्त गाईंचे संगोपन, ४८० मंदिरांचा जीर्णोद्धार, २८०० गावांमध्ये साप्ताहिक महाआरती, ९०० गावांमध्ये दैनिक रामफेरी, बालसंस्कार शिबीरे यांसह अनेक सामाजिक सेवाप्रकल्प त्यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली सुरु आहेत.
त्यांच्या या विशाल कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना २०२४ चा ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार’ देऊन सन्मानित केले आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.