मुंबई प्रतिनिधी :
दि. १६ ऑगस्ट २०२४
महाराष्ट्राचं हित माझ्यापेक्षा आम्ही जपू. मला उमेदवारी मिळो न मिळो, पण यांना खाली खेचू. त्यांच्या युतीत आपल्यात काड्या घालणारे लोक बसले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार की आणखी कोण होणार? मुख्यमंत्रीपदाचा पुढचा चेहरा कोण? सर्वांसमोर मी स्पष्टपणे सांगतो, पवार साहेब, पृथ्वीराजजी, तुम्ही आलात, आताच तुमच्यापैकी कोणाचंही नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर करा, उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल. फक्त स्वतःसाठी लढण्याची भावना माझ्या मनात नाही, असं मोठं विधान शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. महाविकास आघाडीच्या मेळाव्यात ते मुंबईत बोलत होते.
याप्रसंगी उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मी मुख्यमंत्रीपद सोडलं आणि मी पुन्हा लढतोय ते स्वत:साठी लढत नाही. माझ्या महाराष्ट्राच्या हितासाठी लढतोय. महाराष्ट्राला झुकवण्याची हिंमत करणार्याला आम्ही गाडून टाकू. आम्हाला या इतिहासाची पुनरावृत्ती करायची आहे. मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा सुरु आहे. आता नाव जाहीर करा, मी तुम्हाला पाठिंबा देतोय की नाही, ते लगेच सर्वांना समजेल. भाजपवर टीका करतेवेळी उद्धव ठाकरे म्हणाले, जो अनुभव भाजपचा आम्ही घेतला आहे. त्या इतिहासाची पुनरावृत्ती आम्हाला करायची नाही. आमची ३० वर्ष सेना-भाजप युती होती. जागावाटप होताना अशाच बैठका व्हायच्या. बैठकांमध्ये जाहीर केलं जायचं, ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री. एकमेकांच्या पायावर धोंडे पाडण्यासाठी हेच धोरण आम्ही टाकायचो. पाडापाडीच्या राजकारणा युतीला काय महत्व राहिलं? आधी ठरवा आणि मग पुढे चला, मला काही हरकत नाही. पण या धोरणाने जाऊ नये.
राजकीय शत्रूंना लोकसभेत पाणी पाजलंच आहे. संविधानाच्या रक्षणाची लढाई ही लोकसभेची निवडणूक होती. लोकशाहीच्या रक्षणाची ती लढाई होती. महाराष्ट्र धर्म रक्षणाची आताची लढाई आहे. महाराष्ट्राची अस्मिता, संस्कृती आणि स्वाभिमान जपण्याची ही लढाई आहे. महाराष्ट्र लुटायला हे आले आहेत. लढाई लढायची तर कशी लढायची, एकतर तू राहशील नाहितर मी राहिन, या जिद्दीने लढाई लढली पाहिजे. आपल्या मित्रपक्षात फक्त हे नको. जे महाराष्ट्र लुटायला आले आहेत, त्यांना आपण हे सांगायचं आहे.
आमच्या तिन्ही पक्षांची आणि मित्र पक्षांची एकत्र बैठक घेण्याचं बऱ्याच दिवसांपासून ठरत होतं, पण मुहूर्त लागत नव्हता. तो योग आज जुळून आला आहे. स्वातंत्र्यदिन कालच साजरा केला आहे आणि आजपासून आपण पुढच्या लढाईची सुरुवात करत आहोत. निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद आहे. त्यांनी आज महाराष्ट्राची निवडणूक जाहीरच करावी, आमची तयारी आहे. हे बोलायला खूप सोपं आहे की, तयारी आहे, . पण वाटते तितकी ही लढाई सोपी नाहीये, असंही उद्धव ठाकरे पुढे म्हणाले.