सिंधुदुर्ग प्रतिनिधी :
दि. २८ ऑगस्ट २०२४
राज्यातलं वातावरण, छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमधील पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर तापलं आहे. महाविकास आघाडीचे नेते राजकोट किल्ल्यावर कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी पोहोचले.माजी मंत्री आणि शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे किल्ल्यावर पोहोचताच ठाकरे आणि राणे समर्थकांनी एकमेकांविरोधात घोषणा दिल्या. यावेळी किल्ल्यावर जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले.
भाजप खासदार नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांच्या समोर आदित्य ठाकरे येताच जोरदार घोषणाबाजी आणि राडा राजकोट किल्ल्यावर पाहायला मिळाला. ठाकरे आणि राणे समर्थकांनी एकमेकांविरोधात घोषणा दिल्या. त्यांना इथून हटवा. अन्यथा आम्ही त्यांना ताकद दाखवू, असे इशारे दोन्ही बाजूंनी देण्यात आले आहेत. पोलिसांसोबत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची होताना दिसत आहे.
माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार नारायण राणे आपल्या समर्थकांसह एकाचवेळी राजकोटवर पोहोचले. त्यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. पोलिसांनी नेमकी त्यांना आताची वेळ का दिली, असा प्रश्न ठाकरे आणि राणे या दोघांनीही उपस्थित केला. दुर्दैवी घटनेचं राजकारण सुरु असल्याचं म्हणत दोघांनी एकमेकांवर निशाणा साधला. यावेळी माजी खासदार निलेश राणेंनी पोलिसांशी हुज्जत घातली. तुम्ही त्यांना समजवा, आम्ही स्थानिक आहोत असं म्हणत नितेश राणे पोलिसांवर संतापले.
भ्रष्टाचारी भाजपवाले आणि खोकेवाले या दोघांनी छत्रपती शिवाजी महाराजांनादेखील सोडलं नाही. अवघ्या २४ वर्षांचा असलेल्या आपटेला कंत्राट कोणी दिलं? आता तो आपटे कुठेय? कोणी त्याला पळून जायला मदत केली? अशी प्रश्नांची सरबत्ती ठाकरेंनी केली. केवळ घई घाईत पुतळा उभारण्यात आला तो पंतप्रधान नरेंद्र मोदींना खूष करण्यासाठी आणि आता सरकार या सगळ्याचं खापर नौदलावर फोडत आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.