बदलापूर प्रतिनिधी :
दि. २४ सप्टेंबर २०२४
अक्षय शिंदेचा, ज्याच्यावर बदलापूर येथील दोन चिमुकलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता, त्याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला आहे. पोलिसांनी अक्षय शिंदेवर स्वत:ला वाचवण्यासाठी गोळी झाडली होती, ज्यात त्याचा मृत्यू झाला. आरोपी अक्षयचा तळोजा कारागृह ते मुंब्रा बायपास रोड हा १८ किलोमीटरचा ३७ मिनिटांचा प्रवास हा शेवटचा प्रवास ठरला. बदलापूर एन्काऊंटरबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या ३७ मिनिटांच्या प्रवासात कश्यामुळे पोलिसांना अक्षयला गोळी मारावी लागली, असाही प्रश्न विचारला जात आहे.
अक्षयच्या पालकांच्या म्हणण्यानुसार, सोमवारी दुपारी साडेतीन वाजता त्यांनी अक्षयची भेट घेतली. त्यावेळी अक्षय तणावात दिसत असल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितले. त्यावेळी पोलिसांनी अक्षयच्या हातात काही कागदपत्रे दिली होती असे अक्षयच्या आईने सांगितले, . त्याने मला सांगितलं की, ‘आई हे पत्र आहे, वाचून सांग काय आहे. पण मला नीट दिसत नव्हतं, माझ्या पोराला पोलिसांनीच पैसे घेऊन मारलं. ते पत्र त्यांनीच त्याच्या खिशात ठेवलं’, असा आरोप अक्षय शिंदेच्या आईने केला आहे.
जी घटना समोर येते आहे ती अशी – पोलिसांनी अक्षयला रिमांडवर घेण्याची प्रक्रिया सुरू केली. त्याला तळोजा कारागृहातून एका कारमध्ये बसवण्यात आले. कारमध्ये त्यावेळी २ अधिकारी आणि २ एनफोर्सर होते. मात्र, १८ किलोमीटर प्रवास झाल्यानंतर मुंब्रा बायपासजवळून जात असताना एपीआय नीलेश मोरे यांचे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर आरोपी अक्षय शिंदे याने हिसकावून घेतले आणि त्यातून ३ गोळ्या झाडल्या.
गाडीच्या मागच्या सीटवर आरोपी अक्षय शिंदे आणि नीलेश मोरे हे बसले होते आणि एक पोलीस चालक समोरील सीटवर बसला होता. तर शेजारील सीटवर दुसरे पोलीस अधिकारी बसले होते. अक्षय शिंदेने झाडलेल्या गोळ्यांपैकी एक गोळी नीलेश मोरे यांच्या पायाला लागली तर दोन गोळ्या मिस झाल्या. नीलेश मोरे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. या प्रकारानंतर स्वरक्षणार्थ गोळीबार करावा लागला.
पोलिसांच्या वाहनात आधीच जागा कमी होती त्यामुळे अचानक गोळीबार झाल्यानंतर एकच गोंभळ उडाला. त्यामुळे अशा परिस्थितीत जेव्हा पोलिसांना गोळीबार करावा लागला तेव्हा ती गोळी थेट अक्षय शिंदेच्या डोक्यात लागली. हा सर्व प्रकार पोलिसांच्या गाडीत घडला.
नीलेश मोरे आणि अक्षय शिंदे या दोघांना घटनेनंतर कळवा शिवाजी रुग्णालयात दाखल करून नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. रुग्णालयात पोहोचल्यावर अक्षय शिंदेला डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर नीलेश मोरे यांच्यावर उपचार सुरू आहेत.