पुणे प्रतिनिधी:
दि. २६ सप्टेंबर २०२४
तोंडावर आलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, आज (गुरुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार होते. मात्र मोदींचा हा पुणे दौरा मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे रद्द करण्यात आला आहे. तथापि मोदींचा पुणे दौरा तात्पुरता रद्द करण्यात आलेला असून दौर्याची नवीन तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
आज सायंकाळी स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार होती. परंतु, जोरदार पावसाचे सावट या सभेवर आहे. या मैदानावर व सभा मंडपातही मागील दोन दिवसांतील पावसाने पाणी साचले आहे. मैदान कोरडे करण्यासाठी पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रशासन प्रयत्नांची शर्थ करत आहे. सभेला गर्दी होण्याच्या दृष्टीने, भारतीय जनता पक्षासह महायुतीचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच मोदींचा दौरा रद्द झाल्याचे वृत्त समोर आले.
मेट्रो प्रकल्पाच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भूमिगत मार्गाचे उद्घाटन आणि स्वारगेट ते कात्रज या मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार होते. एकूण बारा प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन मोदींच्या हस्ते होणार होते. या विविध उद्घाटनांच्या निमित्ताने स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर पंतप्रधान मोदी यांची सभा होणार होती. परंतु आता ती पुढे ढकलली गेली आहे.
मैदानावर मोठ्या प्रमाणावर चिखल आणि दलदल गेल्या दोन-तीन दिवसांत झालेल्या जोरदार पावसाने झाली आहे. यावर उपाय म्हणून मैदानावर खडी पसरविण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू होती. काही ठिकाणी मैदानावर प्लायवूड टाकण्यात आले आहे. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी स. प. महाविद्यालय येथे तळ ठोकून आहेत. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांनीही स. प. महाविद्यालयाची पाहाणी करून सूचना केल्या होत्या.
केंद्र सरकारचे प्रतिनिधी, पंतप्रधानांच्या सुरक्षा पथकातील अधिकारी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी या सर्वांनी मैदानाची पाहाणी करून आढावा घेतला. त्यात हवामान आणि इतर विविध बाबींवर चर्चा झाली. यातून निघालेल्या निष्कर्षानुसार पंतप्रधानांचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.