ठाणे प्रतिनिधी:
दि. २६ सप्टेंबर
पोलीस चकमकीत, बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर मुंब्रा बायपास परिसरात केला. यानंतर पोलिसी कारवाईवर मुंबई उच्च न्यायालयानं अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलिसांकडे असलेली बंदूक अक्षय शिंदेनं अनलॉक कशी केली, इतक्या पोलिसांवर तो एकटा भारी कसा पडला, सामान्यपणे तुम्ही आरोपीच्या डोक्यावर गोळी झाडता का, प्रश्नांची अशी सरबत्तीच न्यायालयाकडून करण्यात आली. त्यामुळे आता शिंदेचा एन्काऊंटर जिथे झाला ते ठिकाण चर्चेचा विषय ठरत आहे.
ठाण्याच्या दिशेनं येत असलेल्या मुंब्रा बायपासवरील तीन किलोमीटरचा परिसर हा अतिशय निर्जन आहे. सीसीटीव्ही कॅमेरेदेखील या भागात नाहीत. अक्षय शिंदेचा एन्काऊंटर याच भागात झाला. त्यामुळे पोलिसांनी एन्काऊंटर करायच्या उद्देशानंच त्याला इथे आणलं होतं का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे अक्षयचा मृत्यू ज्यांच्या बंदुकीतील गोळीनं झाला, ते पोलीस निरीक्षक वेगवेगळ्या कारणांमुळे वादग्रस्त ठरलेले होते. पोलीस निरीक्षक संजय शिंदे अवघ्या १५ दिवसांपूर्वीच मध्यवर्ती शोध पथकात दाखल झालेले होते.
उद्योगपती मुकेश अंबानींच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पियो कार राज्यात ठाकरे सरकार असताना सापडली होती. या कारचे मालक असलेले मनसुख हिरेन ठाण्यातील होते. मुंब्रा बायपास परिसरातच त्यांचा मृतदेह सापडला होता. खिडकाळीमधील एका गुंडाचा खात्मा त्याआधी याच भागात खूप वर्षांपूर्वी करण्यात आलेला होता. ती कारवाई मुंब्रा पोलिसांनी केली होती. त्यामुळेच मुंब्रा बायपास हा ठाण्यातील ‘एन्काऊंटर झोन’ ठरत आहे असे दिसते.
जिलेटिनच्या कांड्या भरलेली कार उद्योगपती मुकेश अंबानींच्या निवासस्थानाजवळ सापडली. या कारचे मालक आणि या प्रकरणातील एकमेव साक्षीदार मनसुख हिरेन हे होते. त्यांचा मारहाणीत मृत्यू झाला. त्यांचा हा मृत्यू संशयास्पद होता. त्या प्रकरणात सहभाग असलेले सचिन वाझे हे पोलीस दलातील वादग्रस्त अधिकारी होते योगायोगाची बाबच म्हणावी लागेल. सध्याच्या शिंदे एन्काऊंटर प्रकरणातील संजय शिंदे हे देखील वादग्रस्त अधिकारी आहेत.
मुंब्रा खाडी परिसरात मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला होता. त्यांचा मृतदेह मार्च २०२१ मध्ये आढळून आला होता. हा संपूर्ण परिसर निर्मनुष्य असतो. रात्री तिथे अतिशय काळाकुट्ट अंधार सर्वत्र पसरलेला असतो. त्यामुळे या परिसरात लूटमारीच्या घटना सर्रास घडतात. लोक ठाण्याकडे जाण्यासाठी भिवंडी किंवा महापेचा पर्याय निवडतात, ज्यामुळे या भागात फारशी वर्दळ नसते. विशेष म्हणजे या भागात पोलीस चौकीदेखील नाही.