मुंबई प्रतिनिधी :
दि. ०३ ऑक्टोबर २०२४
अग्रवाल नगरी येथील ४१ इमारतींवर नालासोपाऱ्यात हातोडा पडणार असून यासाठी उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. यामुळे ३ हजार कुटुंबे बेघर होण्याची भीती निर्माण झाली असून आता पालिकेकडून इमारतींमधील वीज आणि पाणी कनेक्शन बंद करण्याचं सांगण्यात आलं आहे.
नालासोपाऱ्यातील अग्रवाल नगरी येथे असलेल्या डम्पिंग ग्राऊंड आणि एसटीपी प्लांटसाठी राखीव असलेल्या जमिनीवर उभारलेल्या वादग्रस्त ४१ बेकायदा इमारतींवर हातोडा पडण्याची शक्यात निर्माण झाली आहे. येथील रहिवासी आपली घरं वाचवण्यासाठी, उच्च न्यायालयाच्या इमारती पाडण्याच्या आदेशानंतर प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांना अद्यापही दिलासा मिळालेला नाही. ३० सप्टेंबरपर्यंत महानगर पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी कारवाईला बंदी घातली होती. आता लवकरात लवकर घरे रिकामी करण्याची नोटीस महापालिकेने त्यांना पुन्हा बजावली आहे.
घरं रिकामी करून या बेकायदेशीर ४१ इमारतींमध्ये भाड्याने राहणाऱ्या लोकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ते लोक अतिशय घाबरले आहेत ज्यांची स्वत:ची घरं आहेत. त्यांना घरं रिकामी करावी लागली, तर त्यांचं स्वत:चं, आयुष्यभराची पुंजी जमा करुन घेतलेलं घर त्यांच्या डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होईल.
३० सप्टेंबरपर्यंत महापालिकेने बेकायदेशीर इमारतींच्या तोडकामावर बंदी घातली होती. मात्र लोकांनी अद्यापही इमारती खाली केलेल्या नाहीत. वीज विभागाला पत्र देऊन आता येत्या दोन दिवसांत इमारतींचा वीज आणि पाणीपुरवठा बंद करण्यात येईल, असं महापालिकेने सांगितलं आहे.
नालासोपारा पूर्वेकडील वसंत नगरी, अग्रवाल नगरी , येथील सर्वे क्रमांक २२ ते ३० पर्यंत मोठा भूखंड होता. वसई-विरार मनपाने हा भूखंड डंपिंग ग्राऊंडसाठी आरक्षित ठेवला होता. या भागात जवळपास वस्ती वाढल्यानंतर डंपिंग ग्राऊंडचं आरक्षण हटवून एसटीपी प्लांटसाठी आरक्षित केलं गेलं.
बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक सीताराम गुप्ता आणि त्यांचे पुतणे अरुण गुप्ता या दोघांनी मिळून २००६ आधी या जमिनीवर बेकायदेशीर इमारती बांधण्यास सुरुवात केली होती. येथे २०१० ते २०१२ पर्यंत चार – चार मजल्यांच्या ४१ इमारती उभारण्यात आल्या. या सर्व इमारतींमधील फ्लॅट सीताराम गुप्ताने विकले. इथे तब्बल ४१ इमारती, जागा बेकायदेशीर असल्याची माहिती असूनही उभारल्या गेल्या.
.