नागपूर प्रतिनिधी :
दि. १९ डिसेंबर २०२४
‘महायुती सुसाट गुन्हेगार मोकाट’यासारख्या विविध घोषणा देत विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधान भवन परिसरात रॅली काढत महायुती सरकारविरोधात रोष व्यक्त केला.
परभणी आणि बीड प्रकरणात सरकार गुन्हेगारांना वाचविण्याचे काम करीत असल्याचा आरोप करीत महाविकास आघाडीतर्फे अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळ परिसरात निषेध मोर्चा काढण्यात आला.
विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी आमदारांनी घोषणाबाजी करीत सरकारवर ताशेरे ओढले. सत्ता महायुतीची – पाठराखण हत्येतील आरोपींची, हत्येतील आरोपीचे साथीदार – असंवेदनशील महायुती सरकार.. अशा आशयाचे फलक झळकवीत विरोधकांनी विधान भवनाच्या पायर्यांवर आक्रमक होत प्रचंड घोषणाबाजी केली.
या आंदोलनात भाई जगताप, सचिन अहिर, नाना पटोले, विकास ठाकरे, जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर, राहुल पाटील, सचिन भोईर, आदींचा समावेश होता. आंदोलनादरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दानवे म्हणाले, “परभणी प्रकरणात पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सूर्यवंशीच्या शवविच्छेदन अहवालात स्पष्ट उल्लेख आहे की त्याचा पोलिसाच्या मारहाणीत मृत्यू झाला. तर बीडमधील सरपंचाच्या खून प्रकरणात सरकार आरोपीला पाठीशी घालत आहे. या दोन्ही प्रकरणांत सत्ताधारी आणि त्यांचे हस्तक सहभागी असल्याने महाविकास आघाडीने आंदोलनाची भूमिका घेतली असून हा विषय आम्ही सभागृहातही उचलून धरणार आहोत”.