मुंबई प्रतिनिधी :
दि. १९ डिसेंबर २०२४
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या उपनेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये जाण्याची शक्यता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली आहे. सत्ता माणसाला किती लाचार आणि प्रवाहपतीत करते, अशी टीका अंधारेंनी केली. नीलम गोऱ्हेंना सभापतीपदी संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती, परंतु त्या जागी भाजपने राम शिंदे यांना सभापती केले. या पार्श्वभूमीवर अंधारेंनी सूचक ट्वीट केले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आज नागपुरातील रेशीमबागेत भाजप आणि मित्रपक्षांच्या आमदारांचे बौद्धिक घेतले. यावेळी शिवसेनेच्या विधानपरिषद आमदार-उपसभापती या नात्याने नीलम गोऱ्हेंनीही हजेरी लावली. यावरुन गोऱ्हेंची राजकीय कारकीर्द सांगत अंधारेंनी त्यांना ‘एक्स’ सोशल मीडियावर ट्विट करत टोला लगावला आहे.
“संघ मुख्यालयात गेलेल्या नीलम गोऱ्हेंना जन्मभूमीत गेल्यासारखे वाटले म्हणे! अंगात कर्तृत्व नसेल आणि चापलुसीने काही मिळवण्याची धडपड असेल तर सत्ता माणसाला किती लाचार आणि प्रवाहपतीत करते याचे उत्तम उदाहरण नीलम गोऱ्हे आहेत! आधी भारीप मग राष्ट्रवादी मग शिवसेना मग शिंदे गट आता भाजपची वाट…” असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
दरम्यान, महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरु आहे. अधिवेशनादरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निमंत्रणाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजप आणि शिवसेनेचे सर्व आमदार रेशीमबाग येथील स्मृती भवनात पोहोचले. तिथे सर्वांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या आमदारांनाही संघाने निमंत्रित केले होते. मात्र, विदर्भातून येणारे तुमसर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे हे पक्षाकडून एकमेव लोकप्रतिनिधी संघ मुख्यालयात पोहचले, मात्र अजित पवार यांची अनुपस्थिती होती.
हिवाळी अधिवेशनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप आमदारांच्या बौद्धिक बैठका घेतल्या जातात. दरवर्षीप्रमाणे यावेळीही संघाने महायुतीच्या नेत्यांसाठी ही बौद्धिक बैठक आयोजित केली होती. रेशमबाग येथील स्मृती भवनात गुरुवारी सकाळी ही बैठक झाली. तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला पोहोचले.