मुंबई प्रतिनिधी :
दि. २३ डिसेंबर २०२४
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे रविवारी एका कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त एकत्र दिसले. राज ठाकरेंच्या भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधूंमध्ये खेळीमेळीचे वातावरण पाहायला मिळाले. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुका दोघे एकत्र लढण्याची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत चर्चा गेली अनेक वर्ष सुरु आहे आणि त्या चर्चांमध्ये मीही सहभागी असतो. कारण राज ठाकरेंसोबतही मी जवळून काम केलंय. त्यांचं आणि माझं अनेक वर्ष मित्रत्वाचं नातं राहिलं आहे. त्यांच्या कुटुंबाशी राहिलं, त्यांच्या वडिलांशी नातं राहिलं आहे. उद्धव ठाकरे माझ्या पक्षाचे नेते आहे. तेही माझ्या जवळचे आहेत, माझ्या भाऊ आणि मित्राप्रमाणे आहेत. काल दोन भाऊ एकत्र आले, याचा नक्कीच महाराष्ट्राला आनंद होता. ठाकरे कुटुंबावर महाराष्ट्राचं जीवापाड प्रेम आहे. ठाकरे कुटुंबाचं महाराष्ट्राशी एक नातं आहे. कोणत्याही ठाकरेंकडे त्याच दृष्टीने मराठी माणूस पाहतो, असं संजय राऊत म्हणाले.
आता दोघांचे पक्ष वेगळे आहेत. राज ठाकरेंनी स्वतःचा एक पक्ष स्थापन केला आहे. त्या पक्षाच्या वतीने ते भारतीय जनता पक्षासोबत राहून काम करतात. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शाह हे त्यांचे आयडॉल आहेत. आमच्या पक्षाचं तसं नाही. आमच्या पक्षाच्या मते, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शाह हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. त्यांच्याबरोबर आम्हाला काम करता येणार नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
मुंबई किंवा महाराष्ट्र लुटण्यात, मराठी माणसावर अन्याय करण्यात, शिवसेना फोडण्यात या तिघांचा फार मोठा सहभाग आहे. अशा व्यक्तींबरोबर जाणं हे महाराष्ट्राशी बेईमानी ठरेल आणि दुर्दैवाने राज ठाकरे अशा लोकांची भलामण करतात किंवा त्यांच्यासोबत राहातात. एकेकाळी भाजपसोबत आम्हीही राहिलोय, असा आमच्यावर आरोप होईल. नक्कीच राहिलो. तेव्हा राज ठाकरेही आमच्यासोबत होते. हे वैचारिक मतभेदाचे दोन वेगळे प्रवाह आहेत. कुटुंब एकच असतं. अजित पवार आणि शरद पवारही भेटतात. रोहित पवारही जाऊन त्यांच्या काकांना भेटतात. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेही एकत्र येतात भाऊ म्हणून. कोकणातले राणे आहेत, त्यांचाही एक मुलगा इथे एक तिथे, असे टोलेही संजय राऊतांनी लगावले.
कुटुंबं एक असतात. महाराष्ट्राच्या दृष्टीने काही प्रवाह असतात, त्यात आम्हाला वाहत जाता येत नाही. तरी महाराष्ट्राने विचार केला पाहिजे. शेवटी काय निर्णय घ्यायचा हे ते दोघेच ठरवतील. उद्धव आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ आहेत. त्यांनी घेतलेला निर्णय महाराष्ट्र मान्य करेल. दोघं एकत्र यावेत म्हणून कोण प्रयत्न करणार? माझ्या दृष्टीने कालचा लग्न सोहळा राजकीय विषय नव्हता, याआधीही ते अनेक कार्यक्रमात एकत्र आलेत. परवा ताज लँड्सलाही लग्नाला एकत्र होते. यामुळे त्याकडे राजकीय नजरेने सध्या पाहू नका, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.