पुणे प्रतिनिधी :
दि. १० जानेवारी २०२५
विधानसभा निवडणुकीत दणदणीत कामगिरी केल्यानंतर आता भारतीय जनता पक्षानं महापालिका निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीमधील मित्रपक्ष स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. त्यासाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसलेली आहे. पण पुणे भाजपमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं चित्र आहे. पक्षातील दुफळी आता समोर येऊ लागली आहे. पुणे भाजपचा कारभारी होण्यासाठी नेत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे.
महापालिका निवडणुकीपूर्वी पुणे भाजपचे नेते वेगवेगळ्या बैठका घेऊ लागले आहेत. त्यांच्या स्वतंत्र बैठकांमुळे पक्षातील दुफळी चर्चेचा विषय ठरली आहे. पुणे भाजपचा कारभार कोण पाहणार यावरुन दोन गट पडल्याचं चित्र दिसू लागलं आहे. आमदार माधुरी मिसाळ आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यात चढाओढ सुरु झाली आहे. शहरातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी मोहोळ आणि मिसाळ यांनी स्वतंत्र आढावा बैठका घेतल्या.
पहिल्यांदाच खासदार झालेले मुरलीधर मोहोळ केंद्रात राज्यमंत्री आहेत. तर चौथ्यांदा आमदार झालेल्या माधुरी मिसाळ या फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्री झाल्या आहे. केंद्र आणि राज्य सरकारमधील दोन राज्यमंत्र्यांमध्ये आता छुपा संघर्ष सुरु झाला आहे. शहरावरील आपलं वर्चस्व दाखवण्याचे प्रयत्न दोघांकडूनही सुरु आहेत. त्यासाठी स्वतंत्र बैठका घेतल्या जात आहेत. त्यामुळे पक्षातील एकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
साधारण आठ ते दहा दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी बोलावलेल्या बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील, शहरातील आमदार, माजी नगरसेवक हजर होते. मोहोळ यांनी शहरातील विकासकामांचा आढावा घेतला. त्यानंतर आज मंत्री माधुरी मिसाळ यांनी वेगळी बैठक घेतली. या बैठकीला त्यांच्या गटाचे माजी नगरसेवक उपस्थित होते.
पुणे भाजपमधील दोन नेते स्वतंत्र बैठका घेत असल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यानंतर मिसाळ यांनी स्पष्टीकरण दिलं. कारभारावरुन आमच्यात मतभेद नाहीत. त्यादिवशी मला ऐनवेळी एका बैठकीला जावं लागलं. त्यामुळे मी महापालिकेतील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीला हजर राहू शकले नाही. केंद्रीय मंत्र्यांनी ती बैठक घेतली. कारण सगळ्यांनाच शहरासाठी आपण काहीतरी करायला हवं असं वाटतं, असं मिसाळ म्हणाल्या.