श्रीहरीकोटा प्रतिनिधी :
दि. २९ जानेवारी २०२५
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. संपूर्ण देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी करत इस्रोने आतापर्यंत अनेक यशस्वी मोहिमा फत्ते केल्या आहेत. अशातच इस्रोने बुधवार, २९ जानेवारी रोजी देशातील अंतराळ केंद्रातून १०० वे प्रक्षेपण यशस्वी केले आहे.
इस्रोने बुधवारी सकाळी ६.२३ वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून NVS- 02 वाहून नेणारे GSLV- F15 यशस्वीरित्या अवकाशात प्रक्षेपित केले. देशाच्या अंतराळ केंद्रातून इस्रोचे हे १०० वे प्रक्षेपण होते. इस्रोचे हे अभियान यशस्वी झाले असून या मोहिमेच्या यशाची माहिती इस्रोने दिली आहे. या कामगिरीनंतर आता इस्रोवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. इस्रोचे नवे अध्यक्ष व्ही नारायणन यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबवण्यात आली. त्यांनी १३ जानेवारी रोजी पदभार संभाळला होता. अनेक विद्यार्थ्यांनी सॅटेलाईट प्रक्षेपण अनुभवले. प्रक्षेपण होताच विद्यार्थ्यांनी त्यांचा आनंद टाळ्या वाजवून व्यक्त केला.
इस्रोने बुधवारी सकाळी NVS- 02 वाहून नेणारे GSLV- F15 यशस्वीरित्या प्रक्षेपित केल्यानंतर इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी नारायणन म्हणाले की, “अत्यंत आनंद होत आहे की, या वर्षातील पहिले प्रक्षेपण यशस्वीरित्या पार पडले. हे आपल्या लॉन्च पॅड्सवरून करण्यात आलेले १०० वे प्रक्षेपण आहे जे भारतासाठी एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे. अंतराळ कार्यक्रमाची संकल्पना दूरदर्शी नेते विक्रम साराभाई यांनी केली होती आणि पुढच्या पिढीने ही कल्पना पुढे नेली होती. एपीजे अब्दुल यांच्यासोबत सतीश धवन यांच्या मार्गदर्शनाखाली पहिले प्रक्षेपण वाहन विकसित केले गेले. तेव्हापासून आजपर्यंत, आम्ही १०० प्रक्षेपण पूर्ण केले आहेत.”