छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी :
दि. ०६ फेब्रुवारी २०२५
छत्रपती संभाजी नगर शहरातील जैन समाजाने परवा रविवारी एक निर्णय घेतला. जैन समाजातील कोणाच्याही लग्नात ६ पदार्थांपेक्षा जास्त पदार्थ असतील तर त्या लग्नात वधू वरांना फक्त आशिर्वाद द्यायचे परंतु जेवण करायचे नाही, आणि मग कालच याचे अनुकरण करत अग्रवाल समाजानेही वरील निर्णय राबवायचे ठरवले आहे. याबरोबरचं लग्न पत्रिका छापायची नाही तर फक्त whatsapp व फोन द्वारे निमंत्रण द्यायचे असेही ठरले. खास निर्णय म्हणजे प्री-वेडींग व संगीत संध्या कार्यक्रमावर देखील त्यांनी बंदी घातली आहे. वरील दोन्ही समाज (जैन व अग्रवाल ) आर्थिक दृष्ट्या भक्कम असून देखील त्यांनी वरील निर्णय घेतले हे विशेष!
संबंधितांशी संवाद साधला असता त्यांनी त्यांची काही मते मांडली.
“आजकालची परिस्थिती पाहाता आम्ही विचार केला की, लग्नखर्चाच्या बाबतीत आपण कधी बदलणार? आपण साखरपुड्याचा खर्च लग्नाएवढा करायला लागलो आहोत, वेळ प्रसंगी कर्ज काढून लग्नाचा बडेजाव करतो, आता आपण बदलले पाहिजे हे नक्की. आमच्या या आदर्श व अनुकरणीय निर्णयाचे जास्तीत जास्त लोकांनी मनापासून स्वागत करावे आणि सर्व जाती, धर्म, पंथ यांनी या निर्णयाचे पालन करावे.समाजाने विवाह समारंभाचे रुपांतर विवाह संस्कारा मध्ये केले पाहिजे” असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे गर्दी नको म्हणून शासनाने विवाह, कार्यक्रमातील उपस्थितीला मर्यादा घातल्याने ही बाब प्रकर्षाने लक्षात आली होती, परंतु लोक परत ते सगळं विसरून गेले आणि लाखो करोडो रुपये उधळू लागले. आपण विनाकारण लाखो रूपयांची उधळपट्टी करून कर्जबाजारी होऊ लागलो. आतातरी आपण बदलले पाहिजे. नाही तर काळ आपणांस माफ करणार नाही”. यानंतर त्यांनी मांडलेले काही मुद्दे असे –
१)दिवसेंदिवस शेतीचे उत्पन्न कमी होत आहे.
२) शेती मालाला भाव नाही.
३) सरकारी नोकऱ्या राहिल्या नाहीत.
४) खाजगी नोकरीत शाश्वती नाही.
५) मुलीच्या लग्नाला १०० रु खर्च येत असेल तर मुलालाही ८० रु खर्च येतो.
६) कर्जात जन्मलो, कर्जात वाढलो व कर्जात मरतो अश्या आमच्या काही पिढ्या गेल्या.आता तरी डोळे उघडले पाहिजेत.
७) विवाह हा सोहळा नाही तर तो ‘संस्कार’ आहे . त्याला १६ संस्कारातील एक संस्कार समजला पाहिजे.
८) कितीही मोठं लग्न केलं तरी लोक विसरून जातात.आजवर मोठं लग्न केले म्हणून कोणाला अवॉर्ड मिळालं नाही
९) आपण शेती विकून गुंठ्यावर आलो, तर व्यापारी एका दुकानाचे चार दुकाने करत आहेत. व्यापारीवर्गाला नावं ठेवण्यापेक्षा त्यांचे अर्थशास्त्र समजून घेतले पाहिजे.
१० ) इर्षा नको तर सुदृढ स्पर्धा असली पाहिजे.
११) भाऊ बंदकीतील जीवघेणी स्पर्धा कुठंच नको. विवाह प्रसंगी तर नकोच नको.
१२ ) वर-वधू यांना नेहमीच उपयोगी पडणारा पोशाख घेतला पाहिजे.
१३) वरमाईने सुध्दा रुसवे फुगवे करू नयेत. आपल्यालाही मुलगी आहे. उद्याची सून आपली काळजी घेणारी आपली मुलगीच आहे. ही भावना रुजली पाहिजे.
१४) जेवणावळी, मानपान ही पद्धत बंद करून खर्च कमी करून वधू वरांच्या भावी प्रगतीला हातभार लावावा.
१५) संसारात कधीच उपयोगी न पडणारी भांडी / फर्नीचर तर नकोच.
१६) मेहंदी, वैदिक पध्दत, हळदीच्या कार्यक्रमात होणारी गर्दी टाळावी.स्वागत समारंभात साधेपणा आणावा.
१७) मुळात क्रिकेट ५ दिवसांचा खेळ, तो सुद्धा वन-डे वरुन २० – २० वर आला, तर आपण विवाह छोटेखानी / आटोपशीर करायला काय हरकत आहे ?
१८) मोजक्याच लोकांत सगळ्या पाहुण्यांशी निवांत संवाद साधता येतो.
१९) लग्न पत्रिकेचा खर्च वाचवून, लग्नपत्रिका व्हाट्सअप वरून पाठवावी व संबंधित व्यक्तीला पत्रिका पाठवल्यानंतर फोन करून आग्रहाचे निमंत्रण द्यावे. पुन्हा आठवणीसाठी परत लग्नाच्या अगोदर दोन दिवस फोन करावा.
२०) कोणत्याही जातीधर्मांतील चांगल्या गोष्टींचा स्विकार केलाच पाहिजे .
२१) समाज सूधारण्यासाठी सर्वांनी एक पाऊल पुढे टाकले पाहिजे.
या सर्व बाबींचा विचार करता, लोकांनीही अशी पद्धत सुरू केली पाहिजे असे ते शेवटी म्हणाले.