अयोध्या प्रतिनिधी :
दि. १२ फेब्रुवारी २०२५
अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांचे आज सकाळी निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सत्येंद्र दास यांचे शिष्य प्रदीप दास यांनी याला दुजोरा दिला आहे. लखनऊच्या एसजीपीजीआय येथे दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव तेथून अयोध्येला नेण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. उद्या अयोध्येतील शरयू नदीत त्यांचे अंतिम संस्कार केले जातील. मेंदूत रक्तस्राव झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रभु श्रीरामाची सेवा हेच आयुष्याचे सार आहे, असे समजून श्रीरामचरणी लीन झालेले श्रीराम जन्मभूमीचे मुख्य पुजारी श्री सतेंद्रदास जी यांच्या निधनाने आध्यात्मिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. त्यांचे ३४ वर्षांचे अतुलनीय भक्तीपर्व आज श्रीरामचरणी समर्पित झाले. अयोध्येत श्रीराम मंदिराची भव्य निर्मिती करेन, हा ध्यास बाळगून त्यांनी संन्यास घेतला आणि १९५८ मध्ये घरदार सोडले. त्यांनी तंबूत असलेल्या रामललाची २८ वर्षे पूजा केली. त्यात एक दिवसाचाही खंड पडला नाही. ते कडक तप करीत.. आणि दिवसभर रामनामाचा जप. असंख्य जपमाला हेच त्यांच्या भक्तीचे संचित आहे.
आचार्य सत्येंद्र दास यांना ३ फेब्रुवारी रोजी संजय गांधी पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. ब्रेन स्ट्रोकसोबतच त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची समस्या होती. त्यांना पीजीआयच्या न्यूरोलॉजी वॉर्ड एचडीयूमध्ये दाखल करण्यात आले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, महंत सत्येंद्र दास मधुमेह आणि उच्च रक्तदाबाने ग्रस्त होते. ३ फेब्रुवारी रोजी त्यांना मेंदूत रक्तस्त्राव झाला, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. लखनऊमधील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (SGPGI) येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते, जिथे त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.
प्रखर रामभक्त, श्री रामजन्मभूमी मंदिर, श्री अयोध्या धामचे प्रमुख पुजारी आचार्य श्री सत्येंद्र कुमार दास महाराज यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनाने अध्यात्मिक विश्वाची मोठी हानी झाली आहे. भक्तीचे असे अपूर्व ध्यासपर्व आज संपले.