राजकारण व चित्रपट ही दोन्ही क्षेत्रे तशी एकमेकांच्या विरुद्ध टोक असणारी क्षेत्र आहेत. मात्र, दोन्ही क्षेत्रात एक समान धागा आहे तो म्हणजे, जो चांगला आणि उत्तम अभिनय करेल तो या क्षेत्रात सुपरस्टार होऊ शकतो. महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला तर महाराष्ट्रातील राजकीय व्यक्ती व चित्रपट सृष्ट्रीतील व्यक्ती यांचे फारसे नातेसंबंध निर्माण झालेले दिसत नाहीत. मात्र, काही अपवाद जरुर आहेत. त्यापैकीच एक म्हणजे महाराष्ट्राच्या एका माजी मुख्यमंत्र्याची पत्नी ही सुप्रसिद्ध अभिनेत्री होती. त्या अभिनेत्रीच्या उत्तम अभियानयास अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. तरी सुद्धा चित्रपट व राजकारण या नातेसंबधाची ही गोष्ट महाराष्ट्रातील जनतेला फारशी माहित नाही.
आपण ज्या मुख्यमंत्री महोदयांविषयी बोलत आहोत ते मुख्यमंत्री आहेत, बाळासाहेब सावंत. ते मुळचे कोकणातील होते. परशुराम कृष्णाजी उर्फ बाळासाहेब सावंत हे २४ नोव्हेंबर १९६३ ते ५ डिसेंबर १९६३ या कालावधीत महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री होते. मारोतराव कन्नमवार यांच्या आकस्मिक निधनामुळे महाराष्ट्राच्या हंगामी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे बाळासाहेब सावंत यांच्याकडे आली होती. त्यांनी तेरा दिवस राज्याचे हंगामी मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला ते पेशाने वकिल होते. सावंत हे कोकणातील वेंगुर्ला मतदारसंघातून विधानसभेवर निवडून येत होते. त्यांनी मुख्यमंत्री होण्याआधी कृषीमंत्री व गृहमंत्री म्हणून कार्यभार संभाळला होता.
सन २००१ मध्ये त्यांच्या स्मृतीचा आदर म्हणून कोकण कृषी विद्यापीठाला डॉ. बाळासाहेब सावंत यांचे नाव देऊन नामविस्तार केला गेला.
तर, त्यांच्या पत्नी होत्या, सुप्रसिद्ध अभिनेत्री वनमाला. वनमाला यांचे खरे नाव सुशीलादेवी बापूराव पवार असे होते. सुशीलादेवी बापूराव पवार ऊर्फ वनमाला या मराठी आणि हिंदी चित्रपटांतील राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री होत्या. श्यामची आई चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना इ.स. १९५३ सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा भारतातील राष्ट्रपती पुरस्कार मिळाला.
सुशीलादेवी पवार यांचा जन्म मे २२, इ.स. १९१५ रोजी झाला. त्यांचे वडील बापूराव पवार ग्वाल्हेरचे संस्थानिक शिंदे यांच्या दरबारी सरदार होते. सुशीलादेवींनी बी.ए. पदवी मिळवली. तसेच त्यांनी बी.टी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला होता. पुण्यातील आगरकर हायस्कुल मध्ये त्यांनी काही काळ शिक्षिकेची नोकरी केली. सुशीलाबाईंचे लग्न पी.के.सावंत नावाच्या एका वकिलाशी झाले होते. जे बाळासाहेब सावंत तत्कालीन मुंबई राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. पुढे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मात्र, बाळासाहेब सावंत यांच्याशी घटस्फोट घेऊन सुशीलाबाई पुण्यात आल्या आणि त्यांनी नाटक-चित्रपटांत भूमिका करायला सुरुवात केली.
नागभूषण नवकुमार आणि लच्छूमहाराज यांच्याकडून नृत्य, तर पं. सदाशिवराव अमृतफुले, चम्मनखाँ आणि गणपतराव देवासकर यांच्याकडून सुशीलादेवी हिंदुस्तानी गायकी शिकल्या होत्या. कलेच्या आवडीमुळे त्यांनी कुटुंबीयांचा विरोध पत्करून चित्रपट क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आणि इ.स. १९४० साली लपंडाव चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. इ.स. १९४१ सालच्या “सिकंदर” या चित्रपटाने त्यां हिंदी चित्रपटात आल्या. पुढील काळात त्यांनी वसंतसेना, बाईलवेडा, पायाची दासी इत्यादी मराठी चित्रपटांतून, तसेच आँखमिचौली, महाकवी कालिदास, हातिमताई, शरबती आँखे, परबत पे अपना डेरा इत्यादी हिंदी चित्रपटांतून अभिनय केला.
पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेल्या “श्यामची आई” या पुस्तकावर प्र.के.अत्रे यांनी श्यामची आई चित्रपट बनवला. त्यात श्यामच्या आईची मुख्य व्यक्तिरेखा वनमालाबाईंनी साकारली. हा चित्रपट आणि त्यातील त्यांनी रंगवलेली आईची व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय ठरली. या भूमिकेसाठी त्यांना इ.स. १९५३ सालचा भारतातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रपती पुरस्कार लाभला.
चित्रपटांशिवाय वनमालाबाईंनी मराठी नाटकांतूनही पात्रे रंगवली. त्यांनी रंगवलेल्या संगीत संशयकल्लोळ नाटकातील कृत्तिका, तसेच लग्नाची बेडी नाटकातील रश्मी या भूमिका विशेष गाजल्या. आयुष्याच्या अखेरची काही वर्षे वनमालाबाईंना कर्करोगाने ग्रासले होते. २९ मे २००७ रोजी भारतातील मध्य प्रदेश राज्यात ग्वाल्हेर मुक्कामी त्यांचे निधन झाले.
वनमालाबाईंना श्यामची आई चित्रपटातील भूमिकेसाठी इ.स. १९५३ सालच्या भारतातील राष्ट्रपती पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र राज्य शासनानेही त्यांना व्ही. शांताराम पुरस्कार देऊन गौरवले. वनमालाबाईंनी ’परतीचा प्रवास’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.