मुंबई प्रतिनिधी :
दि. ०४ एप्रिल २०२५
वक्फ बोर्ड सुधारणा कायद्यावरून देशभरात वातावरण तापलं आहे. लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू असताना राज्यातही त्यावरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं. अनेक राजकीय नेते यावर व्यक्त होताना दिसतायत. वक्फ मंडळ दुरुस्ती विधायक लोकसभेत मंजूर करण्यात आलं आहे. लोकसभेत मध्यरात्री उशिरा हे विधेयक मंजूर करण्यात आलं. तर आता सिनेइंडस्ट्रीतल्या एका मुस्लिम अभिनेत्यानं वक्फ बोर्डावर प्रश्नचिन्ह उपस्थित केली आहेत.
अभिनेता कमाल आर खान अर्थात केआरके यानं या वक्फ मंडळ दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दर्शवला आहे. यासंदर्भात त्यानं शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. वक्फ मंडळ दुरुस्ती विधेयक मंजूर करून भाजप सरकारनं मोठं काम केलं आहे. तसंच वक्फ ही एक भ्रष्ट संस्था आहे, असा दावाही त्यानं पोस्टमधून केलाय.
वक्फ बोर्डानं माझ्यासाठी तसंच माझ्या एखाद्या मित्रासाठी, नातेवाईकासाठी, एखाद्या गावासाठी काय केलं आहे? काही भ्रष्ट मुस्लिम लोकांची झोळी भरणारी ही संस्था आहे. त्यामुळं विधेयक मंजूर करून भाजप सरकारनं चांगलं काम केलं आहे. मी अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना यासाठी पाठिंबा देतो. या संस्थाच पूर्ण पणे बंद करा, सगळे अधिकार काढून घ्या…असंही त्यानं यात म्हटलं आहे.
विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे. वक्फ मंडळ दुरुस्ती म्हणजेच ‘एकात्मिक वक्फ व्यवस्थापन, सक्षमीकरण, कार्यक्षमता आणि विकास कायदा, २०२४’ ( उम्मीद) विधेयक अखेर बुधवारी लोकसभेत मांडण्यात आले. चर्चेदरम्यान विरोधी पक्षांकडून केले जाणारे दावे आणि सत्ताधाऱ्यांकडून केले जाणारे प्रतिदावे यामुळं या विधेयकावरील चर्चा बुधवारी रात्री उशिरापर्यंत लांबली. कनिष्ठ सभागृहातील सदस्यसंख्येच्या सरकारकडं स्पष्टपणे झुकलेल्या गणितामुळे मध्यरात्री हे विधेयक २८८ विरुद्ध २३२ मतांनी मंजूर झालं. एका सदस्यानं तटस्थ भूमिका नोंदवली. सरकारला जदयू, धर्मनिरपेक्ष जनता दल, तेलुगू देसम, हम, एलजेपी (रामविलास) शिवसेना, राष्ट्रीय लोक दल, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), पवन कल्याण यांचा जनसेना पक्ष आदींचा पाठिंबा मिळाला.