अहिल्यानगर प्रतिनिधी :
दि. ०७ एप्रिल २०२५
कर्जत नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे ८ नगरसेवक आणि काँग्रेसच्या तिघा नगरसेवकांनी विधान परिषदेचे सभापती तथा भाजप नेते, आमदार प्रा. राम शिंदे यांच्यासोबत रात्री गुप्त बैठक केली. या बैठकीत कर्जत नगरपंचायतीत लवकरच खांदेपालट होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अशी बैठक झाल्याच्या वृत्ताला खुद्द राम शिंदे यांनीही दुजोरा दिला आहे.
कर्जत नगरपंचायतीमध्ये आमदार रोहित पवार यांनी एकहाती सत्ता मिळवत भाजपच्या राम शिंदे यांच्या सत्तेला सुरुंग लावला होता. कर्जत नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे १२ आणि काँग्रेसचे ३ असे महाविकास आघाडीचे एकूण १५ नगरसेवक आहेत. दुसरीकडे भाजपला अवघ्या २ जागा मिळाल्या होत्या.
नगराध्यक्षपदी शरद पवार गटाच्या उषा राऊत, तर काँग्रेसच्या रोहिणी घुले या उपनगराध्यक्ष होत्या. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने जनतेच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, एकाच कुटुंबाकडे पदे जात असल्याने नाराजी उफाळून आली.
दरम्यान, अडीच वर्षांनंतर इच्छुकांमध्ये असंतोष उफाळून आला. दुसरीकडे महाराष्ट्रात महायुती सरकार आल्याने पुन्हा राम शिंदे यांना साथ देऊन कामे मार्गी लावत विकास निधी मिळवायचा, असा निर्धार नगरसेवकांनी केला. रविवारी रामनवमीचे औचित्य साधत ११ नगरसेवकांनी भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.
दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त अहिल्यानगरमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रा. राम शिंदे म्हणाले, की ‘पूर्वी इतर पक्षातील नेते भाजपाला हिणवायचे, टोमणे मारायचे. त्यामुळे भाजपात काम करणारा हा अस्पृश्य असल्याची भावना निर्माण व्हायची. आता हे टिंगल टवाळी करणारेच भाजपच्या आश्रयाला येऊन बसत आहेत. याचा अर्थ आपले विचार आता सर्वांना पटायला लागले आहेत. मात्र, पक्षाच्या विचारांना जर कोणी छेद देत असेल तर त्याच्या विरोधात लढा उभारण्याची तयारी ठेवावी लागेल’ असे प्रा. राम शिंदे यांनी म्हटले.