डीडी न्यूज प्रतिनिधी :
दि. ०९ एप्रिल २०२५
तुमच्याकडे जुने सिमकार्ड असेल तर ही बातमी नक्की वाचा. भारत सरकार मोबाईल फोनमध्ये लावलेले जुने सिमकार्ड बदलण्याचा विचार करत आहे. कारण देशातील सर्वात मोठ्या सायबर सिक्युरिटी एजन्सीला तपासात या सिमकार्डमधील काही चिप्स चीनमधून आल्याचे आढळून आले आहे.
नॅशनल सायबर सिक्युरिटी कोऑर्डिनेटर (NCSC) आणि गृह मंत्रालयाने केलेल्या या तपासात राष्ट्रीय सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली असून जुने सिमकार्ड बदलण्याच्या शक्यतेवर चर्चा सुरू आहे.
‘मिंट’ने दिलेल्या वृत्तानुसार, नॅशनल सायबर सिक्युरिटी कोऑर्डिनेटरने रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया सारख्या बड्या टेलिकॉम कंपन्यांचे अधिकारी आणि दूरसंचार मंत्रालयाच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. तसेच जुने सिमकार्ड बदलण्याच्या आराखड्यावर चर्चा करण्यात आली.
राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव सरकारने हुआवेई आणि झेडटीई सारख्या चिनी उपकरण निर्मात्यांवर यापूर्वीच बंदी घातली आहे. आता राष्ट्रीय सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी लीकॉम उपकरणे भारतात आयात, विक्री किंवा वापरण्यापूर्वी अनिवार्य चाचणी आणि प्रमाणपत्र घ्यावे लागतील, असा नियम करण्यात आला आहे. हा नियम सुनिश्चित करतो की दूरसंचार उपकरणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा, कामगिरी आणि सुरक्षा मानकांचे पालन करतात.
टेलिकॉम कंपन्या सहसा विश्वासू आणि प्रमाणित पुरवठादार असलेल्या विक्रेत्यांना सिमकार्ड खरेदीचे काम देतात. हे विक्रेते व्हिएतनाम आणि तैवान सारख्या मान्यताप्राप्त ठिकाणांहून चिप्स मागवतात. मग ते देशात कार्ड एकत्र करतात, पॅक करतात आणि त्यावर सीरियल नंबर लावतात. यानंतर ते टेलिकॉम कंपन्यांना सिमकार्ड डिलिव्हरी करतात.
काही विक्रेत्यांनी त्यांच्या विश्वासार्ह स्त्रोत प्रमाणपत्राचा गैरवापर केल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. सुरुवातीला त्यांनी आपल्या सिमकार्डची चिप्स अधिकृत पुरवठादारांकडून खरेदी केल्याचा दावा केला होता. परंतु काही चिप्स प्रत्यक्षात चीनमधून आल्याचे तपासात समोर आले आहे.
मार्च 2021 मध्ये दूरसंचार विभागाने युनिफाइड अॅक्सेस सर्व्हिस लायसन्समध्ये सुधारणा केली जेणेकरून टेलिकॉम ऑपरेटर्सना अविश्वसनीय विक्रेत्यांकडून उपकरणे खरेदी करण्यापासून रोखता येईल. नॅशनल सायबर सिक्युरिटी कोऑर्डिनेटरला (NCSC) विश्वासार्ह पुरवठादार आणि अशी उपकरणे तयार करणाऱ्या कंपन्यांना मान्यता देण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, काही विक्रेत्यांनी त्यांच्या विश्वासार्ह स्त्रोत प्रमाणपत्राचा गैरफायदा घेतल्याचे तपासात समोर आले आहे.
दूरसंचार विभागाने बदल केल्यास त्या काळात खरेदी केलेल्या सिमकार्डवर परिणाम होऊ शकतो. याचा अर्थ असा की 2021 पूर्वी आणि नंतरच्या सिम कार्डमध्ये चिनी चिप्स असू शकतात.