पुणे प्रतिनिधी :
दि. १० एप्रिल २०२५
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन गट निर्माण झाले असले तरी पक्षाचे संस्थापक शरद पवार हेच आपले दैवत असल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. पिंपरीत विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अजितदादांनी हे वक्तव्य केले आहे. अण्णा बनसोडेंची मूर्ती लहान पण कीर्ती महान असे म्हणत त्यांचे कौतुक केले.
यावेळी अजित पवार म्हणाले, “कालही आम्ही शरद पवारांना दैवत मानत होतो आणि आजही मानतो. पण देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा नेता लाभला आहे. त्यांनी देशाची मान जगभर उंचावली आहे. त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी हा निर्णय घेतला.” या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. बुधवारी केलेल्या वक्तव्यानंतर आज गुरूवारी अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा पुण्यात पार पडणार आहे त्यानिमित्ताने पवार कुटुंबीय एकत्रित उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी टायमिंग साधल्याचेही बोलले जात आहे.
अजित पवारांनी जागतिक आर्थिक संकटावरही भाष्य केले. ते म्हणाले, “अमेरिकेने आयात शुल्क वाढवल्याने अनेक देशांवर परिणाम झाला आहे. कोरोनानंतर आता हे नवे संकट समोर आले आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडलेल्या संबंधांचा फायदा भारताला नक्कीच होईल.” त्यांनी कार्यकर्त्यांना तळ्यात-मळ्यात न राहाता सक्रिय राहण्याचा सल्ला दिला. यावेळी त्यांनी अण्णा बनसोडे यांचा “पानटपरी ते विधानसभा उपाध्यक्ष” असा प्रेरणादायी प्रवास अधोरेखित करत त्यांचे कौतुक केले. “आता भान ठेवून वागा आणि बोला, कारण सर्वांचे लक्ष तुमच्यावर आहे,” असेही ते म्हणाले.
पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरही अजित पवारांनी ठाम भूमिका मांडली. “कोयता गँग, अमुक-तमुक गँग चालणार नाही. कायदा-सुव्यवस्था सुरळीत ठेवा,” असा दम त्यांनी प्रशासनाला भरला. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत असताना अजित पवारांचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.