बीड प्रतिनिधी :
दि. १० एप्रिल २०२५
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झाली. अनेक गंभीर आरोप करण्यात आले. राज्यातील अनेक भागांमध्ये आक्रोश मोर्चे काढण्यात आले. देशमुखांच्या हत्येनंतर बीडमधील अनेक मारहाणीचे व्हिडीओ हे पुढे येताना दिसले आणि बीड जिल्हा चर्चेत आला. आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर गंभीर आरोप करण्यात आलेत.
संतोष देशमुख यांच्या हत्येवेळचे काही भयानक फोटो व्हायरल झाली आणि मोठी खळबळ उडाली. यानंतर धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा थेट राजीनामा द्यावा लागला. आज संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सुनावणी बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. या सुनावणीत मोठ्या घडामोडी घडल्या कोर्टात नेमके काय घडले ते सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी माध्यमांना सांगितले.
उज्वल निकम म्हणाले की, आरोपी वाल्मिक कराडने काही कागदपत्रे मागवली होती, ती देण्यात आली आहेत. ते सीलबंद दस्तावेज असल्याने उघडल्यानंतर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या मारहाणीचा व्हिडीओ कोर्टात दिला आहे. आरोपीच्या वकिलांनी मागितलेली सर्व कागदपत्रे ही त्यांना देण्यात आली आहेत. वाल्मिक कराडने एक अर्ज कोर्टात दिला आहे. त्यामध्ये काही मुद्दे आहेत.
वाल्मिक कराडने या प्रकरणात आपला सहभाग नसल्याचा अर्ज कोर्टात दिला. या गुन्ह्यात वाल्मिक कराडचा सहभाग नाही आणि इतर काही बाबी या अर्जात आहेत. वाल्मिक कराडची नेमकी संपत्ती किती याबाबत सीआयडीकडून तपास केला जातोय, ही माहिती देखील उज्ज्वल निकम यांनी दिलीयं. आरोपी विष्णू चाटे हा सध्या लातूरच्या कारागृहात आहे. त्याला बीडच्या कारागृहात हलवण्यात यावे, असा अर्ज चाटेचे वकील राहुल मुंडे यांनी केलाय.