छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी :
दि. १५ एप्रिल २०२५
कैलासनगरातील एका घरात तीन दिवसापासून दडून बसलेल्या नागराजाला (कोब्रा) पकडण्यात सर्पमित्रांना यश मिळाले. ‘भिंतीच्या कपारीत तो दडून बसला होता. त्यामुळे भिंत फोडून अखेर त्यास सुरक्षितपणे बाहेर काढावे लागले. त्यानंतर कोब्राला सुरक्षित अधिवासात सोडण्यात आले,’ अशी माहिती सर्पमित्र मनोज गायकवाड यांनी दिली.
कैलासनगर येथील एका घरात गुरुवारी कोब्रा (विषारी नाग) आढळून आला. भेदरलेल्या त्या कुटुंबानी ही बाब लगेच सर्पमित्रांना कळवली. माहिती मिळताच सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्पमित्र मनोज गायकवाड, शुभम साळवे, सूरज पानखडे, चिदंबर काळे तसेच आशिष जोशी यांनी शर्थीचे प्रयत्न केले. नाग त्यांच्या नजरेस पडला; परंतु भिंतीच्या कोपऱ्यात तो दडून बसल्याने तिथून त्यास सुरक्षितपणे काढणे अवघड झाले होते. कोब्राला लपण्यासाठी मुबलक जागा त्या परिसरात असल्याने नाग हाती लागला नाही. दुसऱ्या दिवशीही शोध मोहीम हाती घेतली; परंतु त्याला यश आले नाही.
अखेर भिंत फोडून नागाला सर्पमित्रांनी सुरक्षितपणे बाहेर काढले. दुसरीकडे, या नाग घरात ठाण मांडून बसल्याने ते कुटुंब तीन दिवस शेजारी राहण्यासाठी गेले होते. नागाला पकडताच त्या कुटुंबाचा जीव भांड्यात पडला. दरम्यान हा नाग पाच फुटांचा असून, त्यास वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित अधिवासात सोडण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले. रेस्क्यू टीमच्या सर्पमित्रांनी दोन महिन्यात ३८ विषारी सापांना वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित अधिवासात सोडले.
उन्हाचा पारा वाढल्यामुळे साप घरात येऊ नये म्हणून नागरिकांनी घराच्या आजूबाजूला पालापाचोळा जमू देऊ नये, स्वच्छता राखावी. घराच्या दरवाजाला खाली असलेली फट बंद करून घ्यावी. घराच्या परिसरात उंदीर, बेडूक येणार नाही याची काळजी घ्यावी. चप्पल व बूट ठेवण्याचे रॅक व पक्ष्यांचे खोपे जमिनीपासून पाच फूट उंचावर असावेत अश्या सूचना देण्यात आल्या आहेत.