पुणे प्रतिनिधी :
दि. १५ एप्रिल २०२५
महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवी आघाडी निर्माण होणार असल्याची चर्चा आहे. पुण्यात राज्यातील तीन बडे नेते एकत्र येत असल्याने या चर्चेने जोर धरला आहे. रविवारी पुण्यात युवा संघर्ष निर्धार परिषद २०२५ पार पडणार आहे. त्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर, स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी आणि प्रहार पक्षाचे बच्चू कडु एकत्र येणार आहेत. या परिषदेत एकत्र येत ते सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवणार आहेत. खोट्या आश्वासनांना कंटाळलेल्या तरुणांचा बुलंद निर्धार अशी या परिषदेची टॅगलाइन असून यातूनच त्यांचा हेतू स्पष्ट होतो. हे तीनही नेते एकत्र येत विरोधी पक्षाची जागा घेण्याचा प्रयत्न करणार आहेत.
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात प्रमुख तीन विरोधी पक्ष आहेत. विधानसभेत या विरोधी पक्षांची संख्या ५० इतकी आहे. शिवसेना ठाकरे गटाचे २० आमदार, काँग्रेसचे १६ आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे १० आमदार तसेच इतर पक्षांचे आमदार मिळून जेमतेम ५० आमदारांची संख्या आहे.त्यात मविआला दुबळा करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. ऑपरेशन लोटस, ऑपरेशन टायगर राबवण्यात येत आहे. उद्धव ठाकरेंचे अनेक साथीदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होत आहेत. राजन साळवी,संजना घाडी,संजय घाडी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष, राजू शेट्टींचा स्वाभिमानी पक्ष, स्वराज्य पक्षाचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी एकत्र येत परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन केली होती. तिला तिसरी आघाडी संबोधले जात होते. मात्र महायुतीच्या लाटेत मविआचीच अवस्था बिकट झाली असताना परिवर्तन आघाडीलाही यश मिळाले नाही. अनेक टर्म विधानसभेत निवडून आलेल्या बच्चू कडूंचाही पराभव झाला होता. पण आता बच्चू कडू, राजू शेट्टी आणि महादेव जानकर एकत्र येत नवी आघाडी सुरू करण्याची शक्यता आहे.
महादेव जानकर यांच्या रासपकडे मुख्यत:धनगर समाजाचा पाठिंबा आहे. बच्चू कडूंचा चांगला जनसंपर्क आहे. तर राजू शेट्टी हे शेतकरी नेते असून शेतकरी प्रश्नांवर अत्यंत आक्रमक भूमिका मांडतात. पश्चिम महाराष्ट्रात त्यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे अशी आघाडी निर्माण झाल्यास येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ती काय करिष्मा करते हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.