नवी मुंबई प्रतिनिधी :
दि. १६ एप्रिल २०२५
एका पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारच्या डिक्कीमधून एका व्यक्तीचा हात बाहेर आलेला दिसल्याचा व्हिडीओ सोमवारी सायंकाळी सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, कोपरखैरणेतील चार तरुणांनी लॅपटॉप विक्रीच्या प्रमोशनचा व्हिडीओ, रिल्स तयार करण्यासाठी हा प्रकार केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे पोलिसांसह सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला आहे. मात्र पोलिसांनी या चार तरुणांना ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई करून त्यांची सुटका केली आहे.
संबंधित तरुणांनी निव्वळ लॅपटॉप विक्री प्रमोशच्या नावाखाली एक रील बनवण्यासाठी एका मुलाला गाडीत डिकीत बसवले असल्याचे तपासात समोर आले. तसे व्हिडिओ देखील त्यांनी पोलिसांना दाखवले. मात्र रील बनवण्याच्या नादात समाजात भीती निर्माण करण्याचं काम तरुणांनी केल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे कार्यक्रम सुरू असतानाच वाशी ते सानपाडा रेल्वे स्थानकालगतच्या सर्व्हिस रोडवर डिक्कीमधून एका व्यक्तीचा हात बाहेर असलेली एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडी जाताना निदर्शनास आली. हा प्रकार संशयास्पद असल्याचे वाटल्याने काही नागरिकांनी मोबाइलद्वारे त्याचा व्हिडीओ तयार करुन पोलिसांना माहिती दिली. हा व्हिडीओ काही वेळातच व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची एकच धावाधाव सुरु झाली
सानपाडा पोलिसांनी व गुन्हे शाखेने या कारच्या नंबरवरुन त्याच्या मालकाचा शोध घेतला असता, ती साकीनाका येथील व्यक्तीची असल्याचे तसेच कोपरखैरणेत राहणाऱ्या मीनहाज शेख याने त्याची इनोव्हा कार लग्नकार्यासाठी नेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कोपरखैरणे येथून शेख याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याचे वाशीत लॅपटॉप दुरुस्तीचे व खरेदी विक्रीचे दुकान असल्याचे त्याने सांगितले.
तसेच लॅपटॉप विक्रीच्या प्रमोशनकरीता व्हिडिओ रिल्स बनवताना कारच्या डिक्कीमधून मृत व्यक्तीचा हात बाहेर आला आहे, हे भासवण्यासाठी त्यांनी हा प्रकार केल्याचे सांगितले.