डीडी न्यूज प्रतिनिधी : उमेश नाडकर
अंबरनाथ : दि. २२ एप्रिल २०२५
अंबरनाथ येथील प्रथितयश बांधकाम व्यावसायिक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर भरदुपारी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. अंबरनाथ येथील प्रथितयश बांधकाम व्यावसायिक विश्वनाथ पनवेलकर यांचे पूर्व भागातील हुतात्मा चौक येथे निवासस्थान व कार्यालय आहे.आज दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्या घराच्या दिशेने पिस्तुलातून दोन राऊंड फायर करीत पळ काढला. ही संपूर्ण घटना स्वतःपनवेलकर यांच्या घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. ही बातमी कळताच स्थानिक शिवाजी नगर पोलीस व क्राईम ब्रांचची टीम घटनास्थळी दाखल झाली असून पुढील तपास करीत आहेत. पोलिसांना घटनास्थळी गोळ्यांच्या दोन पुंगळ्या सापडल्या आहेत. भरदुपारी हा गोळीबाराचा प्रकार घडल्याने या भागातील नागरिक व व्यावसायिकांत भीतीचे वातावरण दिसून येत आहे. हा हल्ला नेमका कश्यामुळे झाला असावा याच्या कारणांचा पोलीस शोध घेत असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांच्या टीम तातडीने रवाना करण्यात आल्या आहेत. स्वतः पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी घटनास्थळी भेट देवून संपूर्ण घटनेचा आढवा घेतला आहे व तपास पथकाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत.