नवी दिल्ली प्रतिनिधी :
दि. ०७ मे २०२५
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला दोन आठवडे पूर्ण झाले. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यांनी हा हल्ला केला त्यांना त्यांच्या कल्पनेहून कठोर शिक्षा देण्याचं विधान केलं होतं. आता भारतीय लष्कर आणि हवाई दलाने मिळून पाकिस्तानने पहलगाममध्ये केलेल्या भ्याड हल्ल्याविरोधात मोठी कारवाई केली. या कारवाईत भारताकडून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला आहे.
या हल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव देण्यात आलं आहे. भारतीय लष्कर आणि हवाई दलाने एकत्रितपणे ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं. भारताने पाकिस्तानवर केलेला हा हल्ला मध्यरात्री १ वाजून ४४ मिनिटांनी करण्यात आला. भारतीय लष्कराने एका प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईअंतर्गत, लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केलं, जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले आखले जात होते आणि हल्ल्याचे निर्देश दिले जात होते. या हल्ल्यांमध्ये भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांच्या अचूक शस्त्र प्रणालींचा वापर करण्यात आला
भारताने केलेली ही कारवाई पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये अनेक ठिकाणी करण्यात आली. भारतीय सैन्याने काही ठिकाणं निवडली होती, ज्या ठिकाणी हल्ला करायचा होता ती हीच ठिकाणं होती. एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कराला जैश-ए-मोहम्मद आणि लष्करच्या मोठ्या नेत्यांना लक्ष्य करायचं होतं. जे भारतात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यात सहभागी होते. म्हणून सैन्याने या ठिकाणांवर हल्ला करण्याची योजना आखली आणि ती पूर्ण केली.
संरक्षण तज्ञ प्रफुल्ल बक्षी यांनी भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत सांगितलं, की भारताने काहीतरी केलं आहे. नऊ ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं आहे. हा हल्ला जमिनीवरुन तसंच हवेतून झाला. पाकिस्तान प्रत्युत्तर देईल असंही ते म्हणाले. पीओके ताब्यात घेण्यासाठी फक्त हल्ला करणं पुरेसं नाही, तर आपल्याला तो हळूहळू ताब्यात घ्यावा लागेल. पीओके आपला आहे आणि आपण तो जिंकू, पीओके ताब्यात घेण्यासाठी आपल्याला हळूहळू पुढे जावं लागेल. केवळ एकदा हल्ला करून समस्या सुटणार नाही, असंही ते म्हणाले.
भारताकडून केवळ दहशतवादी ठिकाणांवरच हल्ला
भारतीय लष्कराकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारताने लक्ष्य निवडताना आणि हल्ला करताना खूप संयम बाळगला. भारताने विचारपूर्वक केवळ दहशतवादी ठिकाणांवरच हल्ला केला जेणेकरुन इतर कोणालाही इजा होऊ नये. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे, ज्या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांनी आपला जीव गमावला होता.