आळंदी प्रतिनिधी : दिनेश कुर्हाडे पाटील
दि. ०७ मे २०२५
संत ज्ञानेश्वर महाराज ७५० वा जन्मोत्सव निमित्त आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सदिच्छा भेट दिली. गाथा मंदिराचे अध्यक्ष हभप पांडुरंग महाराज घुले यांच्या सुश्राव्य किर्तनात मंत्री फुंडकर यांनी उपस्थित राहून किर्तन श्रवण केले.
यावेळी आळंदी देवस्थानच्या वतीने मंत्री फुंडकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आळंदी देवस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष महेंद्र महाजन, प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ, पालखी सोहळाप्रमुख डॅा.भावार्थ देखणे, विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज कबीर, पुरुषोत्तम महाराज पाटील, ॲड.रोहिणी पवार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर उपस्थित होते.
यावेळी फुंडकर यांनी सांगितले की तिर्थक्षेत्र आळंदीच्या विकास आरखाड्यासाठी सरकार सकारात्मक असून त्यामुळे आळंदी च्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. वारकरी संप्रदायाच्या पाठबळावरच हे महायुतीचे सरकार आले असून आपण दिलेल्या मार्गदर्शनावर व विचारावर आम्ही चालत आहोत. चौंडी येथे झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत आळंदीच्या विकास आरखाड्यावर सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच हा आरखाडा मार्गी लागण्यासाठी आपल्याला निधीची कमतरता पडू देणार नाही असे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले.