जळगाव प्रतिनिधी :
दि. ०८ मे २०२५
लग्न झाल्यानंतर सर्वांना सुखी संसाराची आवड निर्माण होते. लग्नानंतर फिरायला जाणे वैवाहिक जीवन सुखाने जगणे हे प्रत्येकाला आवडते. मात्र जवान मनोज पाटील यांचे पाच मे रोजी लग्न झाले आणि आठ तारखेला त्यांना देश सेवेसाठी तात्काळ हजर राहण्याचा कॉल आला. कुठलाही विचार न करता मनोज पाटील यांच्या अंगावरची हळद ओली असतानाच हातावर रंगलेल्या मेहंदी सह जवान आज (८ मे) रोजी रवाना झाले.
देशात युद्धजन्य परिस्थिती असल्याने जवानांना त्वरित बोलावणे आले आहे. जवानांनीही देशाच्या कर्तव्याला प्राधान्य देत तडक ८रोजी सीमेवर जाण्यासाठी निर्णय घेतला. लग्नाची मनोहर स्वप्ने, आयुष्यभराच्या जोडीदारासोबत फिरण्याचे नियोजन, भविष्याबाबतच्या कल्पना, या सर्व गोड क्षणांना तिलांजली देऊन सोमवारी (५ मे) लग्न झालेला मनोज ज्ञानेश्वर पाटील (खेडगाव नंदीचे) हा जवान हळदीचा रंग अंगावर असतानाच कर्तव्य बजावण्यासाठी आज सीमेवर रवाना झाला.
नाचणखेड़े (ता. पाचोरा) येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी हिच्याशी खेडगाव नंदीचे येथील ज्ञानेश्वर लुभान पाटील यांचा मुलगा मनोजचे लग्न ठरले. लग्नासाठी सुटी घेऊन मनोज गावी आले होते. पाचोरा येथे लग्न सामारंभ आटोपत नाही, तोच मनोज यांस कर्तव्याच्या ठिकाणी त्वरित बोलावणे आले आहे.
कुटुंबासोबत लग्नाचा आनंद साजरा होत असतानाच देशसेवेच्या कर्तव्यावर जावे लागल्याचा मनोज यांना गर्व आहे. देशापेक्षा मोठे काहीही नाही, अशा भावना मनोज यांनी व्यक्त केल्या आहेत. मनोज यांची पत्नी यामिनी यांनी देखील या कठीण परिस्थितीत देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य असल्याची प्रतिक्रया दिली. देशातील सर्वच जवानांच्या सुट्ट्या शासनाने रद्द केल्यामुळे घरी परतलेल्या जवानांना पुन्हा देश सेवेसाठी हजर राहावे लागत आहे. यातच स्वतःच्या लग्नासाठी रजेवर आलेला मनोज देखील हातावर सजलेली मेहंदी, अंगावर राहिलेली हळद अशा परिस्थितीत आज देशाच्या कर्तव्यासाठी रवाना झाला. या निर्णयाचे परिसरातून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे