करजगाव प्रतिनिधी : निलेश भोकरे
दि. १२ मे २०२५
दूषित पाणी आणि खराब स्वच्छता हे कॉलरा,गॅस्ट्रो, अतिसार,हिपॅटायटीस ए, टायफॉइड सारख्या आजारांच्या संक्रमणाशी जोडलेले आहेत.
चांदुर बाजार तालुक्यातील शिरसगाव कसबा ग्रामपंचायत हद्दीतील पाणी टाकी परिसरात पाण्याच्या टाकीचा व्हॉल्व्ह गेल्या अनेक महिन्यांपासून नादुरुस्त असल्याने लाखो लिटर पाणी वाया तर गेलेच शिवाय नागरिकांच्या जीवाशी खेळ ही चालू असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.जल वाहिनीवरील व्हॉल्व्ह च्या बिघाडामुळे तेथील टाकीचा परिसर जलमय झाला असून त्यामध्ये शेवाळ,बुरशिजन्य विषारी कीटक,कचरा आदी असून तेथे गढूळ पाण्याचे डबके साचले आहे त्या लिकेज द्वारे मुख्य पाईपलाईन मध्ये पाणी जात असल्याने नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे होत आहे.परिसरात साथीचे रोग व अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात.
लोकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असून, या भागातील समस्या सोडवण्यासाठी स्थायी उपाययोजना करण्याची गरज आहे. तात्पुरती मलमपट्टी कामाची नाही हे या भागाची पाहणी केल्यावर दिसल्याचे स्पष्ट होत आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत गांभीर्याने दखल घेऊन तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करून पाणी दूषित होण्यामागील कारणांचा शोध घेऊन योग्य कार्यवाही करणे आवश्यक आहे.
शिरसगाव ग्रामपंचायतीला पिवळे कार्ड; उपाययोजना नाही
पाणी पुरवठा जलस्रोत अस्वच्छ असल्याने व इतर मापदंड नसल्या कारणाने आरोग्य विभागाकडून पिवळे कार्ड दिले आहे.यामुळे पाणी पिणाऱ्या लोकांना धोका निर्माण होऊ शकतो.
“व्हॉल्व्ह लिकेज मुळे गढूळ पाणी मुख्य पाईपलाईन मध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.या विषयासंबंधी ग्रामपंचायत ला तोंडी व लेखी स्वरूपात कळविले आहे” असे सुरेश वतारी
आरोग्य सेवक, शि.कसबा म्हणाले. “तसेच पाणी टाकी परिसरात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल” असे मत सुरेश रेखाते ग्रामसेवक, ग्रा.पं. शि.कसबा यांनी नोंदविले आहे.