मुंबई प्रतिनिधी :
दि. १३ मे २०२५
आजवर बऱ्याच दैवी शक्तींनी धर्माचं रक्षण आणि अधर्माला पराभूत करण्यासाठी भूतलावर अवतार घेतले आहेत. पुराणांपासून इतिहासापर्यंत ठिकठिकाणी याची उदाहरणं पाहायला मिळतात, पण काही मानवी शरीरधारीसुद्धा धर्माचं रक्षण करता करता स्वत:च देवपदाला पोहोचले. सतराव्या शतकातील महाराणी अहिल्यादेवी होळकर या त्यापैकीच एक आहेत. याच थोर महाराणींची यशोगाथा ‘धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर – एक युग’ या आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून हा चित्रपट २३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.
निर्माते सोमनाथ शिंदे यांनी लयभारी प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार केलेल्या ‘धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर’ चित्रपटाची प्रस्तुती नितीन धवणे फिल्म्स यांनी केली आहे. नितीन धवणे पाटील या चित्रपटाचे सहनिर्माते तसेच प्रस्तुतकर्ते आहेत. वीर पराक्रमी महिला योद्ध्याची अद्भुत यशोगाथा दाखवण्यासाठी रसिकांना सतराव्या शतकात नेणाऱ्या सुशांत सोनवले यांनी या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केलं आहे.
पूर्वीच्या काळी स्वातंत्र्य, रणधुमाळी आणि रणसंग्रामाचा विचार म्हणजे काय? याची अचूक व्याख्या सांगत ‘धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर’ चित्रपटाचा ट्रेलर सुरू होतो. युद्धाची धुमश्चक्री सुरू असते आणि एक मराठा मावळा प्राणपणाने लढत असल्याचे दिसतंय. ‘धनगराची लेक एक दिवस मराठा साम्राज्याचा भगवा सातासमुद्रापार फडकवेल’, असं म्हणत लहानग्या अहिल्यादेवींची एन्ट्री होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरावर घेतलेल्या शपथेप्रमाणे अहिल्यादेवी एक शपथ घेतात आणि गनिमावर तुटून पडतात. शत्रूला कंठस्नान घालणाऱ्या अहिल्यादेवींनी १२ ज्योतिर्लिंगे तसेच चार धामांसह हजारो मंदिरांचा जीर्णोद्धार केला. धर्माच्या रक्षणासाठी जे गरजेचं होतं ते केलं. गनिमाला मराठ्यांच्या तलवारीची धार दाखवणाऱ्या जिगरबाज महाराणीची चित्तथरारक गाथा ‘धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर’ चित्रपटात पाहायला मिळणार असल्याचे संकेत देणारा ट्रेलर चित्रपटाबाबत उत्कंठा वाढवणारा आहे. ‘हिंदू हा फक्त धर्म नाही, तर जगाला शिकवण देणाऱ्या आमच्या तुकोबारायांची गाथा आहे’, असे बरेच अर्थपूर्ण डायलॉग चित्रपट पाहताना अंगावर रोमांच आणणारे आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने इ. स. १७६७ ते इ. स. १७९५ या काळात राज्य करणाऱ्या भारतातील माळव्यातील तत्त्वज्ञानी महाराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्याबाईंची कहाणी चित्रपट रूपात जगासमोर येणार आहे.
या सिनेमामध्ये ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे अहिल्यादेवींच्या भूमिकेत आहे. त्याचबरोबर या सिनेमात राहुल राजे, सुहास जाधव, संदेश कदम, सुरेश विश्वकर्मा, अनिल नगरकर, संजय खापरे, सुनील गोडसे, संजीवनी जाधव, शिवा रिंदानी हे कलाकार आहेत.