मंचर, पुणे प्रतिनिधी :
दि. १४ मे २०२५
विषारी सर्पदंश झालेल्या आईला उपचारांसाठी नारायणगाव येथील सर्पदंश व विषबाधातज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत यांच्या दवाखान्यात दाखल करून केंद्रीय राखीव पोलिस दलात (सीआरपीएफ) कर्तव्य बजावत असलेले जवान बापू सीताराम भोईर हे देशसेवेसाठी कर्तव्यासाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे या वीर जवानाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील निगडाळे येथील सीआरपीएफ जवान बापू सीताराम भोईर यांच्या मातोश्रींना विषारी सर्पदंश झाला होता. त्यानंतर उपचारांसाठी नारायणगाव येथील सर्पदंश व विषबाधा तज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र देशसेवेसाठी पहलगाम येथे रवाना होऊन त्यांनी मातृभक्तीसोबत कर्तव्यनिष्ठेचे उदाहरण घालून दिले आहे.
बापू भोईर हे राष्ट्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स (सीआरपीएफ) मध्ये कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. त्रिपुरा आणि श्रीनगर येथे त्यांनी 13 वर्षे देशसेवा केली आहे. सध्या ते पहलगाम येथे तैनात आहेत. एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर एक महिन्याच्या सुट्टीसाठी २९ एप्रिल रोजी गावी आले होते. दोन मे रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांच्या आई पार्वताबाई भोईर (वय 60) यांना भातखाचराची भाजणी करताना ‘फुरसे’ या विषारी सर्पाने पायाला दंश केला. त्यांना प्रथम मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना डॉ. सदानंद राऊत यांच्या रुग्णालयात हलवण्यात आले.
आईच्या उपचारादरम्यान भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर बापू यांची रजा रद्द करण्यात आली. 8 मे रोजी त्यांना त्वरित पहलगाममधील कुलग्राम येथे हजर राहण्याचे आदेश मिळाले. आईच्या उपचारांची जबाबदारी डॉ. राऊत यांच्यावर सोपवून बापू निर्धास्तपणे देशसेवेसाठी रवाना झाले.
“तुम्ही काळजी करू नका, आईला व्यवस्थित उपचार करून घरी सोडू,” असे आश्वासन डॉ. राऊत यांनी दिले. डॉ. राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बापू यांना मानसिक आधार देत त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम केला. बापू यांच्या या त्यागामुळे त्यांचे गावात आणि परिसरात कौतुक होत आहे.