पुणे प्रतिनिधी :
दि. १५ मे २०२५
मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवत असलेल्या टोळीवर कारवाई करत पुणे पोलिसांनी बाप-लेकाला अटक केली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई करण्यात आली. बाणेर परिसरातील ’24 थाई स्पा’ येथे छापा टाकत दोन महिलांची सुटका करण्यात आली. त्या महिलांना जबरदस्तीने देह व्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते.
या प्रकरणात पोलिसांनी सिराज चौधरी (वय 55) आणि त्याचा मुलगा वसीम चौधरी याच्यासह स्पा ऑपरेटर दीपक चव्हाण, नागालँडची रहिवासी ज्योती देवी (38) आणि जबलपूरची रहिवासी अमनगिरी गोसवानी (23) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बाणेर पोलिसांनी सोमवारी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास ‘24 थाई स्पा’ वर छापा टाकत ही कारवाई केली. यावेळी पोलिस उपनिरीक्षक दीपाली पाटील, रूपेश चाळके आणि निरीक्षक सावंत यांनी नेतृत्व केलं. चौकशीतून समोर आलं की, वसीमने ही जागा दीपक चव्हाणला भाड्याने दिली होती आणि त्याच्या मदतीनेच स्पामध्ये देह व्यवसाय सुरू होता.
पोलिस तपासात उघड झालं की, सिराज आणि वसीम हे बापलेक एक यूट्यूब न्यूज पोर्टल चालवत होते. या माध्यमातून ते अन्य स्पा मालकांना ब्लॅकमेल करत असत. वसीम स्पाय कॅमेरा वापरुन ब्युटी सलून आणि स्पा सेंटरमध्ये जात असे व त्यानंतर त्यांचे व्हिडीओ तयार करून मालकांकडून पैसे उकळत असे.
सिराजवर यापूर्वी बलात्काराचा गुन्हाही दाखल असल्याचे समजते. ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात तो आणि त्याचा साथीदार यश तिवारी (24) या दोघांवर एका पार्टीदरम्यान 25 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, महिला नवी मुंबईतील कॉर्पोरेट कंपनीत कार्यरत असून, कंपनी मॅनेजरने आयोजित केलेल्या पार्टीत ही घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी 8 मे रोजी दोघांना अटक केली असून, सध्या ते पोलिस कोठडीत आहेत.
पोलिस आयुक्तांकडून कठोर कारवाईचे निर्देश –
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यातील बेकायदेशीर स्पा आणि मसाज सेंटरवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. गेल्या वर्षभरात 35 पेक्षा अधिक स्पा केंद्रांवर छापे टाकून, 36 जणांवर वेश्याव्यवसायाच्या संदर्भातील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच, अशा ठिकाणांची मालमत्ता भाड्याने देणाऱ्या जागा मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.