हिंगणा प्रतिनिधी : अनिल पवार
दि. २४ मे २०२५
हिंगणा तालुक्यातील शेषनगर येथील आदिवासी पारधी समाजाचे शेतकरी श्रीधर पवार यांच्या संत्रा बागेचे काल (20 मे 2025) झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या मुसळधार पावसाने आणि वादळी वाऱ्याने 25 ते 30 संत्र्याची झाडे समूळ उखडली गेली, ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. श्रीधर पवार यांनी कर्ज काढून संत्रा बागेची लागवड केली होती. यावर्षी पिकाला सुरुवात होत असतानाच या नैसर्गिक आपत्तीने त्यांच्या आशा धुळीला मिळाल्या. या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, त्यांनी शासनाकडे तात्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. स्थानिक शेतकऱ्यांनीही या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली असून, प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी विनंती केली आहे. शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी शासकीय मदत मिळणे अत्यंत गरजेचे आहे. हिंगणा तहसीलदार सचिन कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित गावातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी यांनी डेगमा ग्रामपंचायत अंतर्गत शेषनगर येथील शेतकरी नुकसान ग्रस्त श्रीधर पवार यांच्या शेतात नुकसानीचा पंचनामा केला असून तात्काळ संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी करिता शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.