दिवा प्रतिनिधी :
दि. २८ जून २०२५
दिवा शहरात ठाकरे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे आणि याच बॅनरची आता चर्चा सुरु झाली. बॅनरवर चक्क दोन्ही ठाकरे बंधूंचा फोटो आहे, याशिवाय आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे. तर मनसेचे नेते आणि माजी आमदार राजू पाटील आणि ठाकरे गटा जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांचा एकत्र फोटो लावण्यात असून आपल्या मराठीसाठी, आपल्या मायबोलीसाठी, आपल्या मातीसाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी ५ जुलैच्या मोर्चाला या, असे आवाहन केले आहे. तर ठाकरे बंधूंना एकत्र पाहण्यासाठी ५ तारखेला सर्वांनी या, असेही आवाहन बॅनर मधून केले आहे.
दरम्यान शिवसेना ठाकरे सेनेचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी सांगितले की हिंदी सक्ती विरोधात मोर्चा असून दिवेकरांनी याला उपस्थिती लावावी, तसेच मुंडे पुढे म्हणाले की शिंदे गटाने भाजपच्या पायघड्या घातल्या आहेत, त्यांना मराठी अस्मिता राहिली नाही. जर त्यांना खरंच मराठीची अस्मिता असेल, तर ते आंदोलनात येतील, असा टोलाही लगावाला.
येत्या पाच तारखेला मराठी भाषेला अनुसरून दोन्ही ठाकरे बंधू मुंबईमध्ये मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाला पाठिंबा आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने देखील दिला आहे व मोर्चात देखील सामिल होणार आहेत. यानंतर ठाण्यामध्ये सकाळीच बॅनर बाजी पाहायला मिळते. राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासह बॅनरवर आता थेट शरद पवारांचे देखील फोटो लावले असल्याने अनेक चर्चा सध्या शहरात रंगू लागल्या आहेत. तर बॅनरवर मराठीसाठी आम्ही एकत्र आलोय आता आवाज उठवायचा, ठाकरेंच्या नेतृत्वात एकत्र येऊया असा देखील मजकूर लिहिला आहे.
ठाकरे शिवसेनेची आणि मनसे एकत्र येण्याची सुरवात डोंबिवली मधून झाली. 5 जुलैला मराठीसाठी दोन्ही बंधू एकत्र येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. याबाबत ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सांगितले की, महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा मोर्चा मुंबईमध्ये होतोय. तो मोर्चा ऐतिहासिक मोर्चा असणार आहे. आम्हाला सगळ्यांना आनंद आहे की उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब मराठीसाठी एकत्र आल्यामुळे एक वेगळा आनंद प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहे. उद्धव साहेबांनी सर्व मराठी माणसांसाठी लिहिलेल एक पत्र आहे, सर्व डोंबिवलीतील प्रतिष्ठित लोक, डॉक्टर, वकील आणि सर्व मराठी कलाकार या सर्वांपर्यत आम्ही ते पत्र पोहोचवणार आहोत. डोंबिवलीतून मोठ्या प्रमाणात लोक या मोर्चात सहभागी होतील. आम्ही मनसे नेते राजू पाटलांना आवाहन करू की आमच्या सोबत एकत्र लोकल मधून या आणि आपण या मोर्चामध्ये सहभागी होऊया, असे म्हात्रे यांनी सांगितले.