लोणंद प्रतिनिधी :
दि. २८ जून २०२५
आषाढी एकादशी जवळ येते आहे तशी संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होते आहे. हजारो वारकर्यांच्या भक्तीने आसमंत उजळून जातो आहे, विठुरायाच्या नामघोषात तल्लीन होतो आहे.
याच क्रमात ही पालखी दि. २६ जून रोजी लोणंद येथे पोहोचली. वारकर्यांचा श्रमपरिहार सुरू असताना महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागातर्फे एक आगळा उपक्रम वारकरी व भक्तांच्या उपस्थितीत साकारला गेला.
तरुण, उमद्या कलाकारांतर्फे जनजागृतीसाठी पथनाट्य सादर केले गेले. ‘आपल्याला मिळालेला अमूल्य वेळ फुकट न घालवता सत्कारणी लावावा’ हा संदेश एका करमणूकप्रधान पथनाट्याच्या माध्यमातून उपस्थितांसमोर सादर केला गेला. बर्याच वेळा आपण निष्फळ गोष्टींमध्ये आपला अमूल्य वेळ वाया घालवत असतो. हा वेळ आपल्या आयुष्यात परत कधीच येणार नसतो. त्यामुळे या वेळाला अतिशय महत्त्व दिले पाहिजे, असा गर्भितार्थ या पथनाट्याचा होता. प्रेक्षकांचा त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला.
महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागातर्फे किर्तन, भारुड, पथनाट्य, वासुदेव अश्या विविध मार्गांनी राबविला जाणारा जनजागृतीचा हा उपक्रम जनतेच्या आकर्षणाचा आणि कौतुकाचा विषय ठरतो आहे. त्यातून अपेक्षित उद्देश साध्य होताना दिसतो आहे.