फलटण प्रतिनिधी :
दि. २८ जून २०२५
महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने यावर्षीच्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गावर एक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे. जनजागृतीसाठी विविध मार्गांचा वाळंब शासनातर्फे केला जातो. यानुसार या विभागाने जनजागृतीसाठी तसेच आपल्या कार्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘वासुदेव’ या आपल्या लहानपणापासून जवळचा असलेल्या वासुदेवाची मदत घेतली आहे.
फलटण एस. टी. स्टँडवर या वासुदेवांनी बहार आणत जनजागृती केली. शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या कार्याची, योजनांची माहिती त्यांनी कुशलतेने नागरिकांपर्यंत पोहोचविली. त्यास प्रवाश्यांचा इतर उपस्थितांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागातर्फे किर्तन, भारुड, पथनाट्य, वासुदेव अश्या विविध मार्गांनी राबविला जाणारा जनजागृतीचा हा उपक्रम जनतेच्या आकर्षणाचा आणि कौतुकाचा विषय ठरतो आहे. त्यातून अपेक्षित उद्देश साध्य होताना दिसतो आहे.