माळशिरस प्रतिनिधी :
दि. ०२ जुलै २०२५
आषाढ महिना म्हटलं की एकादशीचे वेध सर्वांना लागतात. आषाढी एकादशी हा विठू माऊलीच्या सार्या भक्तांचा आणि विशेषतः वारकर्यांचा अखंड आनंद सोहळा! त्याच एकादशीच्या पूर्वार्धात सारे वारकरी, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांबरोबर पंढरीच्या दिशेने मजल दरमजल करत मार्गस्थ होतात. त्यांना उन्हा पावसाची तमा नसते. पण ठिकठिकाणी विठ्ठलाची भक्तमंडळी त्यांची बडदास्त ठेवण्यास तत्पर असतात. त्यांच्या प्रबोधनासाठी, श्रमपरिहारासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम योजले जातात.
महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागानेही या वारकर्यांच्या प्रबोधनासाठी आणि आपले कार्य सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘भारुड’ या कलाप्रकाराचा अवलंब केला आहे. मंगळवार दि. ०१ जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर, माळशिरस येथे या भारुडाने बहार आणत, उपस्थितांचे मनोरंजनात्मक मार्गाने प्रबोधन केले आणि मदत व पुनर्वसन विभागाच्या कार्याची माहिती लोकांना दिली. वारकरी व उपस्थितांना विभागाच्या कार्याची माहिती होण्याबरोबरच त्यांचा श्रमपरिहारही झाला.