नवी दिल्ली प्रतिनिधी :
दि. ११ जुलै २०२५
केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील भाजप सरकार सत्तेत आल्यापासून पक्षानं एक अघोषित परंपरा विकसित केलेली आहे. वयाची पंचाहत्तरी ओलांडल्यावर नेते निवृत्त होतात. पक्षाचे अनेक माजी खासदार, राज्यपालांना याच कारणामुळे पक्षानं ना निवडणुकीचं तिकीट दिलं, ना त्यांचा कार्यकाळ वाढवला. आता भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी नागपुरमध्ये याचा पुनरुच्चार केला. त्या विधानाचा संदर्भ पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जोडला जात आहे. ७५ वर्ष म्हणजे वय झालंय, असं भागवत म्हणाले. विशेष म्हणजे यावर्षी १७ सप्टेंबरला पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे होणार आहेत.
वयाची ७५ वर्षे पूर्ण झाल्यावर नेत्यांनी निवृत्त व्हायला हवं, असा सल्ला सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिलेला आहे. योगायोग म्हणजे स्वत: भागवतदेखील याच वर्षी ७५ वर्षांचे होणार आहेत. ९ जुलै रोजी नागपुरात संघाचे विचारवंत मोरोपंत पिंगळे यांना समर्पित एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात भागवत बोलत होते. ‘ज्यावेळी तुम्ही ७५ वर्षांचे होता, त्याचा अर्थ आता तुम्ही थांबायला हवं आणि दुसऱ्यांसाठी मार्ग मोकळा करायला हवा,’ असं भागवत म्हणाले.
नरेंद्र मोदींनी २०१६ मध्ये नोटबंदीचा निर्णय घेतला. त्यानंतर विरोधकांनी त्यांना धारेवर धरलं होतं. नोटबंदीमुळे गरिबांना सहन कराव्या लागलेल्या अडचणींचे मुद्दे विरोधकांकडून उपस्थित केले जात होते. त्यावेळी ३ डिसेंबर २०१६ रोजी उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये परिवर्तन रॅलीला संबोधित करताना मोदींनी नोटबंदी म्हणजे भ्रष्टाचार विरोधातील अभियान असल्याचं सांगितलं. ‘हम तो फकीर आदमी है, झोला लेके चल पडेंगे’, असं विधान करत त्यांनी विरोधकांना लक्ष्य केलं होतं. मी देशसेवा करतोय आणि त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्यास तयार असल्याचा संदेश मोदींनी त्यावेळी दिला होता.
आता भागवत यांनी पंचाहत्तरी आणि निवृत्तीचा मुद्दा उपस्थित केलेला असताना त्याचा संबंध मोदींशी लावला जात आहे. संघाचे वरिष्ठ विचारक आणि संघातून भाजपमध्ये आलेल्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यानं भागवत यांच्या विधानांचे अर्थ उलगडून सांगितले. ‘संघाचं काम इशारा करण्याचं आहे. स्वयंसेवक संघ वेळोवेळी त्यांची ही जबाबदारी पार पाडतो,’ असं पदाधिकाऱ्यानं सांगितलं. याचा अर्थ सरसंघचालकांचा इशारा पंतप्रधान मोदी आणि स्वत:कडे आहे.
संघातून भाजपमध्ये आलेल्या पदाधिकाऱ्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर भागवत यांच्या विधानाचा अर्थ सांगितला. ‘मोहन भागवत यांनी मांडलेला विचार हाच सनातन संस्कृती आहे. नरेंद्र मोदीदेखील भागवत यांच्या इतकेच प्रामाणिक स्वयंसेवक आहेत. भागवत आता सरसंघचालक आहेत. मोदींनी त्यांची सूचना आदेश मानल्यास ते थांबू शकतात. पण पंतप्रधान मोदी स्वत:च सक्षम आहेत. थांबण्याची वेळ आल्याचं लक्षात येताच ते स्वत:हूनच हा निर्णय घेतील. त्यासाठी त्यांना भागवत यांच्या सल्ल्याची गरज नसेल,’ असं हा वरिष्ठ पदाधिकारी म्हणाला.