मुंबई प्रतिनिधी :
दि. १५ जुलै २०२५
विशेष सरकारी वकील आणि राज्यसभेचे नवोदित सदस्य उज्ज्वल निकम यांनी अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान 1993 मध्ये झालेला मुंबई बॉम्बस्फोट आणि बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यां+च्याबद्दल धक्कादायक दावा केला आहे. मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की जर संजय दत्तने त्यावेळी तोंड उघडले असते तर मुंबई शहर बॉम्बस्फोटांनी हादरले नसते आणि २६७ लोकांचा जीव गेला नसता.
संजय दत्तच्या एका चुकीमुळे मुंबईत बॉम्बस्फोट
१९९३ च्या बॉम्बस्फोटांशिवाय अनेक हाय-प्रोफाइल दहशतवादी प्रकरणांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून काम केलेले उज्ज्वल निकम यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले की, “अबू सालेम बॉम्बस्फोटाच्या एक दिवस आधी संजय दत्तच्या घरी शस्त्रांनी भरलेली व्हॅन घेऊन गेला होता. अभिनेत्याने त्यातून काही हँडग्रेनेड आणि बंदुका घेतल्या होत्या, त्यावेळी त्याने फक्त AK-47 बंदूक स्वतःकडे ठेवली होती आणि बाकी सर्व काही परत केल्या होत्या. जर संजय दत्तने त्या शस्त्रांनी भरलेल्या व्हॅनबद्दल पोलिसांना तेव्हाच माहिती दिली असती तर पोलिसांनी तपास केला असता आणि १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत झालेला बॉम्बस्फोट रोखता आला असता.”
ते पुढे म्हणाले, “पोलिसांना माहिती न देणे हेच एवढा मोठा दहशतवादी हल्ला होण्यामागील कारण होते. अभिनेत्याने बाळगलेल्या मौनामुळे अनेकांचे
जीव गेले.” बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याबद्दल संजय दत्तला टाडा अंतर्गत अटक करण्यात आली होती. नंतर त्याला फक्त शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत दोषी ठरवण्यात आले आणि पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. अभिनेत्याने पुण्याच्या येरवडा तुरुंगात ही शिक्षा पूर्ण केली. 2016 मध्ये त्याची सुटका झाली.
मुलाखतीदरम्यान, उज्वल निकम यांनी संजय दत्तला शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत दोषी ठरवण्यात आले तेव्हा त्यांनी अभिनेत्याला काय म्हटले होते ते देखील सांगितले. निकम म्हणाले, “मला त्याचे हाव भाव बदलताना दिसले. मला वाटले की त्याला धक्का बसला आहे. तो निकाल सहन करू शकला नाही आणि त्याचा चेहरा पडला होता. मी विटनेस बॉक्समध्ये उभ्या असलेल्या संजय दत्तला सांगितले, ‘संजय, असे करू नकोस. मीडिया तुला पाहत आहे. तू एक अभिनेता आहेस. जर तू शिक्षेला घाबरलेला दिसलास तर लोक तुला दोषी मानतील. तुला अपील करण्याची संधी आहे.’ त्यावर संजय दत्तने “होय सर, हो सर” असे म्हटले आणि त्यानंतर तो गप्प बसला आणि निघून गेला.
उज्वल निकम यांनी असाही दावा केला की संजय दत्त निर्दोष आहे. त्याने शस्त्रांचा शौक असल्यानेच बंदूक ठेवली होती. कायद्याच्या दृष्टीने त्याने गुन्हा केला असला तरी प्रत्यक्षात तो एक साधा माणूस आहे. संजयकडे एके-47होती, पण त्याने ती कधीही वापरली नाही.