नाशिक प्रतिनिधी :
दि. २२ जुलै २०२२
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सभागृहात कामकाज सुरू असताना रमी खेळत असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. मात्र मला रमी खेळताच येत नाही, काही जणांनी विनाकारण माझी बदनाी केली, असा आरोप करत कोकाटे यांनी चौकशीची मागणी केली आहे. या मागे मोठे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत ते राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहेत. ज्यांनी त्यांची बदनामी केली, त्यांच्यावर ते खटला दाखल करणार, असा इशारा माणिकराव कोकाटे यांनी दिला आहे. नाशिकमधील या पत्रकार परिषदेत त्यांनी मित्रपक्षांबद्दल केलेलं वक्तव्यही चर्चेचा विषय ठरलं आहे.
नेत्यांचे सीडीआर तपासण्याची मागणी तुमच्याकडून केली जात आहे, त्यामध्ये तुमच्या पक्षातील किंवा मित्रपक्षातील लोकही सहभागी असू शकतात का, असा प्रश्न पत्रकारांकडून माणिकराव कोकाटे यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना कोकाटे म्हणाले की, “असू शकतील ना. जे नेते यात सहभागी असतील त्यांची नावे चौकशीतून बाहेर येतील. यासंदर्भात कोण-कोण नेते कोणाशी बोलतात, काय ब्रिफ करतात याची माहिती घेण्यात येईल. यात काही मीडियाचेही लोक असतील, तीही चौकशी करावी लागेल. याबाबत विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती चौकशी करतील,” असं कोकाटे यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना माणिकराव कोकाटे म्हणाले, “रमीसाठी मोबाईल नंबर, अकाऊंट नंबर जोडणे आवश्यक असते. मात्र, आजपर्यंत माझं कुठलही अकाऊंट नाही,” असं सांगत त्यांनी आपले नंबर आणि अकाऊंट चेक करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितलं की, सहाय्यकाचा मोबाईल वापरताना अनेकदा जाहिराती येतात. त्या बंद करणे अवघड असते. “माझी संपूर्ण चौकशी करावी. कॅमेरे शोधावे. मी जर रमी खेळत असेल असे आढळले, दोषी असेल तर मी राज्यपालांकडे जाऊन राजीनामा देईन,” असं कोकाटे म्हणाले.
एखाद्या मंत्र्याने सभागृहात रमी खेळणं बरोबर नसल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. मी मुख्यमंत्र्यांकडे माझी बाजू मांडली नसल्याने त्यांनी असं वक्तव्य केलं असावं, असं कोकाटे यांनी म्हटलं आहे. “या प्रकरणात मी मुख्यमंत्र्यांना ब्रीफ केलेलं नाही, माझ्याकडून त्यांना काहीही सांगण्यात आलं नाही. तसंच त्यांच्याकडून याप्रकरणी कोणतीही चौकशीही करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांचा असा समज होणं, साहजिक आहे. मीडियावर विश्वास ठेवून मुख्यमंत्र्यांनी अशी प्रतिक्रिया दिली असेल. रमी खेळणं बरोबर नाही आणि मी रमी खेळलेलोच नाही. मी मागील २५ वर्षांपासून विधानसभेत आहे आणि विधानसभेचे नियम, कायदे सगळे मला समजतात. विधानसभेत काय करावं काय करू नये, विधानपरिषदेत काय करावं काय करू नये, याच्या नियमांची मला माहीती आहे. मी चुकीचे काम आजपर्यंत केले नाही,” असा दावा कोकाटे यांनी केला आहे.