नाशिक प्रतिनिधी :
दि. २२ जुलै २०२५
नाशिकमध्ये हनी ट्रॅप प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात महसूल खात्यातील एका बड्या शासकीय अधिकाऱ्याचे नाव समोर आल्याने जमीन व्यवहाराच्या संशयावरून महसूल विभागाने अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. ठाणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये येऊन संशयित हॉटेलची झाडाझडती घेतल्याने प्रकरणाला वेगळे वळण लागले असून विरोधी पक्षांनी या प्रकरणावर आवाज उठवल्याने सरकारवर चौकशीसाठी दबाव वाढला आहे.
नाशिकमधील जमिनींना मागील काही वर्षांपासून सोन्याचा भाव आहे. त्यामुळे हनी ट्रॅपच्या माध्यमातून जमीन व्यवहारांसाठी ‘गोल्डन गँग’ सक्रिय असल्याची चर्चा आहे. संशयित हॉटेल व्यावसायिक जमीन व्यवहारात सक्रिय आहे. त्यामुळे या व्यावसायिकाशी संबंधित शर्तीच्या जमिनी आणि आदिवासी जमिनींच्या व्यवहारांची चौकशी असल्याची माहिती समोर आली आहे.
नाशिक पोलिसांकडे कोणतीही अधिकृत तक्रार नसली तरी राज्याच्या राजकारणात हे प्रकरण चर्चेत आल्याने पोलिसांनी गोपनीय चौकशी सुरू केली असल्याची माहिती आहे. “नाशिक पोलिसांकडे तक्रार नाही, तरी ठाणे पोलिसांनी शहरात येऊन हॉटेलची झाडाझडती घेतली,” असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. आगामी काळात या प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. तसंच तपासासाठी विशेष पथकाची नेमणूक होऊ शकते. गरज पडल्यास सायबर क्राईमचीही मदत घेतली जाणार असल्याचे समजते.
विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले आहे. या प्रकरणात ७० हून अधिक अधिकारी आणि नेते अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये आजी-माजी मंत्र्यांचाही समावेश असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे विरोधी पक्षांकडून निष्पक्ष चौकशीची मागणी केली जात असून या प्रकरणाच्या तपासाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
हनी ट्रॅपशी संबंधित प्रकरणाच्या तपासासाठी शनिवारी पोलिसांनी नाशिक शहरातील एका हॉटेलची तपासणी केली. तसंच या हॉटेलमधील चर्चित असलेली रूम सील केल्याचं बोललं जात आहे. परंतु या कारवाईबाबत पोलिसांकडून कसलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.