पुणे प्रतिनिधी :
दि. २६ जुलै २०२५
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे सकाळी लवकर अनेकदा आपल्या पाहणी दौऱ्यावर जातात. त्यामुळे अधिकाऱ्यांसह सर्वांचीच तारांबळ उडालेली पाहायला मिळते. हिंजवडीमध्ये नागरी समस्या आणि विकास कामांच्या सुरुवातीची माहिती घेण्यासंदर्भात अजित दादा दोन आठवड्यांनी पुन्हा एकदा पाहाणीसाठी आले होते. जो कोण मध्ये येईल त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश या भेटी दरम्यान दादांनी दिले. दादांनी सर्वांसमोर त्यावेळी हिंजवडी गावचे सरपंच यांना झापल्याचं दिसून आलं. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून दादा इतके आक्रमक का झाले होते हा प्रश्न सर्वांना पडला आहे.
“कोणीही मध्ये आलं की ३५३ लावायचं. अजित पवार मध्ये आले तरी लावायचं. त्याशिवाय हे काम होणार नाही.आपल्याला संपूर्ण काम करून टाकायचं आहे.” असं विकास कामांची माहिती घेत असताना अजित पवार म्हणाले. त्यानंतर हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर यांनी रस्त्यामध्ये मंदिरात येत असल्याचं सांगितलं. त्यानंतर दादा आक्रमक झाले आणि सरपंचांना सर्वांसमोरच खडे बोल सुनावले.
“अहो असू द्या हो साहेब, धरणं करताना मंदिर जातातच ना! तुम्हाला सांगायचं ते सांगा मी ऐकून घेतो, मी काय करायचे ते करतो. आपलं वाटोळं झालं, माझ्या पुण्यातून-महाराष्ट्रातून हिंजवडीचं सगळं आयटी पार्क बंगलोर- हैदराबादला बाहेर चाललं. तुम्हाला काय पडलं नाही. कशाला मी सहा वाजता येतो मला कळत नाही.” असं अजित पवार आक्रमकपणे म्हणाले. दादांना ज्यावेळी दिसलं की माध्यमांचे कॅमेरे चालू आहेत तेव्हा त्यांनी, कॅमेरे बंद करायला संगितले.
हिंजवडी परिसरात मोठे आयटी पार्क आणि अनेक कंपन्या आहेत. त्यामुळे देशभरातून लोक त्या भागात नोकरीसाठी येत आहेत. तिथे वाहतूक आणि नागरी समस्याही वाढत्या लोकसंख्येमुळे वाढत आहेत. मागील पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्याचे पाहायला मिळाले होते. हिंजवडी येथे राष्ट्रीय महामार्ग असल्या कारणाने पुणेकरांना गर्दीचा खूप त्रास सहना करावा लागत आहे.