मुंबई प्रतिनिधी :
दि. २९ जुलै २०२५
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राज आणि उद्धव यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. त्यातच आता उद्धव ठाकरे यांचे पुत्र, माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांची भेट होणार असल्याची पक्की माहिती पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने दिली.
ही भेट नेमकी कुठे आणि केव्हा होणार हे अजून नक्की झालेले नाही तरी लवकरात लवकर ही भेट घडवून आणण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षातील नेते मंडळींकडून सुरू असल्याची माहिती पक्षातील वरिष्ठ नेत्याने दिली.
विशेष बाब अशी की, येत्या गणेशोत्सवात उद्धव ठाकरेही राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेणार असल्याची माहिती मिळत आहे. राज ठाकरे वेगळे झाल्यापासून उद्धव ठाकरे त्यांच्या घरी गेल्याचं ऐकिवात नाही. त्यामुळे राज यांच्या नवीन निवासस्थानी त्यांची ही पहिलीच भेट असेल.
दरम्यान, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे की, आगामी पालिका निवडणुकीसाठी हे दोघेही ठाकरे बंधू एकत्र येतील. राज्यभरात ही चर्चा मोठ्या प्रमाणात झडत असतानाच राज ठाकरे हे रविवारी अनेक वर्षांनंतर मातोश्रीवर पोहोचले. उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ते तेथे पोहोचले असे समजत असले तरी या भेटीने पुन्हा ठाकरे बंधूंच्या मनोमीलनाच्या चर्चेला उधाण आले आहे.
राज आणि उद्धव यांच्या भेटीची जोरदार चर्चा एकीकडे सुरू असतानाच आता ठाकरे बंधूंचे पुत्र अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या भेटीसाठीही हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांमार्फत मिळते आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या मराठीच्या मेळाव्यात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. त्याबरोबरच अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हेही व्यासपीठावर एकत्र आल्यानंतर एकच जल्लोष झाला होता. त्यामुळे आता कनिष्ठ ठाकरे बंधू केव्हा आणि कशा पद्धतीने एकत्र येतील, यासाठी दोन्ही पक्षातील नेतेमंडळींचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे समजते.