मुंबई प्रतिनिधी :
दि. ०२ ऑगस्ट २०२५
मुंबईहून कोलकात्याला जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्स विमानात एका प्रवाशाने कमालीचा गोंधळ घातला. पॅनिक अटॅक आलेल्या सहप्रवाशाला त्याने चक्क कानशिलात लगावली. ही घटना शुक्रवारी घडल्याचे समजते. आरोपी प्रवाश्याला विमान कंपनीने सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात दिलं आहे. तर होसैन अहमद मजुमदार ही पॅनिक अटॅक आलेली व्यक्ती बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे.
होसैन अहमद मजुमदार नामक प्रवाशाला, विमान मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर असताना पॅनिक अटॅक आला. तो रडत रडत विमानातून खाली उतरु देण्याची विनंती करु लागला. आरोपीने याचवेळी त्याच्या कानशिलात लगावली. यामुळे विमानात चांगलीच खळबळ उडाली. इतर प्रवासी, विमान कर्मचारीही आरोपी प्रवाशाला जाब विचारु लागले. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर विमानातील प्रवासी-कर्मचारी अशा सर्वांनीच होसैनला मदत केली. त्याला शांत करून आपल्या सीटवर बसवलं.
दरम्यान, कोलकात्याला पोहोचल्यानंतर होसैन बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. आसामच्या कचर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेला, मात्र सध्या मुंबईतील एका जिममध्ये काम करत असलेला होसैन गायब झाल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहेत.
आपल्या गावी कचर जिल्ह्यातील काटीगोराह येथे होसैन परत येत होता. या कानाशीलात लगावण्याच्या घटनेनंतर होसैन कोलकाताहून सिल्चरला जाणाऱ्या कनेक्टिंग फ्लाइटने जाणार होता, पण तो पोहोचलाच नाही. सिल्चर विमानतळावर कुटुंबीय त्याची वाट पाहात होते, पण त्याचा फोन बंद येत होता. तो मुंबईतच राहिला असण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.
या घटनेनंतर होसैनचे नातेवाईक जुबेरुल इस्लाम मजुमदार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, “सिल्चरच्या विमानात जेव्हा तो सापडला नाही, तेव्हा स्थानिक प्रशासनाशी आम्ही संपर्क साधला. सिल्चर विमानतळाजवळ असलेल्या उधरबंद पोलीस स्टेशनलाही गेलो. पण त्याच्या ठिकाण्याबद्दल कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही.”
यावर इंडिगो प्रशासनाने ‘एक्स’वर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “मुंबई कोलकाता विमानातील एका घटनेबद्दल आम्ही माहिती देत आहोत. अशा प्रकारचं गैरवर्तन पूर्णपणे अस्वीकार्य आहे. आम्ही प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही कृत्याचा निषेध करतो. आमच्या कर्मचाऱ्यांनी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर्सनुसार कार्यवाही केली. गैरवर्तन केल्याप्रकरणी कोलकात्यात आगमन झाल्यावर संबंधित व्यक्तीला सुरक्षा अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. प्रोटोकॉलनुसार सर्व संबंधित नियामक संस्थांना माहिती देण्यात आली आहे. आमच्या सर्व विमानांमध्ये आम्ही सुरक्षित आणि आदरपूर्ण वातावरण राखण्यासाठी कटिबद्ध आहोत.”