मुंबई प्रतिनिधी :
दि. ०२ ऑगस्ट २०२५
मुंबई पोलिसांच्या EOW शाखेने, मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामात घोटाळा केल्याच्या आरोपाखाली केतन कदम आणि जय जोशी यांच्या विरोधात ७,००० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी मागवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत या दोघांनी फेरफार करून सुमारे ४.५ कोटी रुपयांचा घपला केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्यावर, या प्रकरणी बनावट कागदपत्रे वापरल्याबद्दल IPC कलम ४७४ अंतर्गत आरोप करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, अद्याप आरोपपत्राची न्यायालयाने दखल घेतलेली नाही. लवकरच आरोपपत्र अधिकृतपणे दाखल केले जाईल. १५ ते १६ जणांचे जबाब EOW ने या प्रकरणात नोंदवले आहेत. मध्यस्थ म्हणून काम करत, केतन कदम आणि जय जोशी यांनी काही ठराविक कंपन्यांना मिठी नदीच्या कामाचे कंत्राट मिळवून देण्यासाठी मदत केली, असा देखील त्यांच्यावर आरोप आहे.
BMC चे काही मोठे अधिकारी आणि खाजगी कंत्राटदार कंपन्यांचे संचालक देखील या घोटाळ्यात सामील आहेत. मिठी नदीतील गाळ उपसण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. या निविदांमधील काही ठराविक कंत्राटदारांना काम मिळावे या हेतूने मुंबई महानगरपालिकेच्या काही मोठ्या अधिकाऱ्यांना वशीला लावला जात होता. ६ मे रोजी याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आला होता. यामध्ये १३ जणांची नावे आहेत. या FIR मध्ये सहाय्यक अभियंता प्रशांत रामुगडे, निवृत्त मुख्य अभियंता गणेश बेंद्रे आणि उपमुख्य अभियंता (पूर्व उपनगरे) तायशेट्ये यांच्या नावांचा देखील समावेश आहे.
आरोपींमध्ये दीपक मोहन, किशोर मेनन, भूपेंद्र पुरोहित आणि इतर काही जणांचाही समावेश आहे. सध्या हे सर्वजण फरार आहेत. निविदांमध्ये गडबड आणि बनावट कागदपत्रे सादर केल्याचे मुंबई पोलिसांच्या EOW च्या तपासात उघड झाले आहे. “या प्रकरणात मध्यस्थ म्हणून केतन कदम आणि जय जोशी यांनी काम केले ज्यांनी आधीच निवडलेल्या कंपन्यांना नदीतील गाळ काढण्याचे कंत्राट मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले” असे आरोपपत्रात म्हटले आहे.