मुंबई प्रतिनिधी :
दि. ०२ ऑगस्ट २०२५
आपल्याला, देशभरात मानाचा समजला जाणारा ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ मिळावा असं अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं, . अनेकांचं स्वप्न असणाऱ्या या पुरस्काराची आता घोषणा करण्यात आली आहे. ०१ ऑगस्ट रोजी ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ही घोषणा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून करण्यात आली. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान ‘श्यामची आई’ या सिनेमाने पटकावला आहे. सुजय डहाके दिग्दर्शित या सिनेमात संदीप पाठक, गौरी देशपांडे, ओम भूतकर, शर्व गाडगीळ, सारंग साठ्ये, मयुर मोरे, ज्योती चांदेकर, सुनील अभ्यंकर या कलाकारांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
आचार्य अत्रे यांनी १९५३ साली ‘श्यामची आई’ हा चित्रपट केला होता, त्यानंतर २०२३ साली साने गुरुजी यांच्या १९३३ सालच्या त्याच नावाच्या साहित्यकृतीवर बेतलेला नवा ‘श्यामची आई’ हा सिनेमा रीलिज झाला होता. कृष्ण-धवल काळात घेऊन जाणारा हा सिनेमा प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेणारा ठरला. दिग्दर्शक सुजय डहाकेच्या यांच्या या कलाकृतीचे विशेष कौतुकदेखील झाले होते. २ वर्षांपूर्वी गाजलेल्या या सिनेमाने आता राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर नाव कोरले आहे.
तर विक्रांत मेस्सीच्या नावाची घोषणा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारासाठी झाली, त्याला ‘ट्वेल्थ फेल’ सिनेमासाठी हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. याशिवाय ‘जवान’ सिनेमासाठी शाहरुख खानलादेखील ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ हा पुरस्कार देण्यात येणार आहे. शाहरुखचा हा पहिला राष्ट्रीय पुरस्कार आहे. SRK आणि विक्रांत यांना हा पुरस्कार विभागून देण्यात येईल. त्याचप्रमाणे, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्कारावर राणी मुखर्जीने मोहोर उमटवली. राणीला ‘मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे’ या सिनेमासाठी हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. ‘द केरला स्टोरी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार सुदीप्तो सेन यांना जाहीर झाला आहे.
दरम्यान कोरोना काळात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देण्यास विलंब झाला होता, ती परिस्थिती अद्यापही सुधारलेली नाही. त्यामुळे, यंदा जाहीर करण्यात आलेले पुरस्कार हे २०२३ साली आलेल्या चित्रपटांसाठी देण्यात येत आहेत. जसे की, २०२४ साली झालेल्या ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात, २०२२ साली आलेल्या चित्रपटांशी संबंधित पुरस्कार प्रदान करण्यात आले होते.