वसई प्रतिनिधी :
दि. ०२ ऑगस्ट २०२५
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या वसईतील अनोख्या आंदोलनाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होते आहे. वसईमधील चक्क बेनापट्टी हिंदू स्मशानभूमीत वसई-विरार महापालिकेनं लहान मुलांसाठी खेळणी ठेवली आहेत. या स्मशानभूमीत घसरगुंडी, झोपाळे अशी नानाविध खेळणी काही दिवसांपूर्वीच बसवण्यात आली. पण स्मशानभूमीत खेळायला कोण जाणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यामुळे स्मशानभूमीत खेळांची साधनं लावून करण्यात आलेला खर्च नेमका कोणासाठी हा प्रश्न उपस्थित झाला आहे. स्थानिकांनी पालिका प्रशासनाचा अनोख्या पद्धतीनं निषेध केला असून या निषेधाची चर्चा सध्या सगळ्या वसईत आहे.
स्मशानभूमीत घसरगुंडी, झोपाळे लावणाऱ्या वसई विरार महापालिकांचा स्थानिकांकडून अनोख्या पद्धतीनं निषेध करण्यात आला. आंदोलक त्यांच्या चेहऱ्यांवर भुतांचे मुखवटे लावून पालिकेच्या कार्यालयात गेले. तिथे त्यांनी पालिका प्रशासनाचे आभार मानले. स्मशानभूमीत घसरगुंडी, झोपाळे, सी सॉ बसवून भुतांच्या मनोरंजनाची, खेळण्या बागडण्याची सोय केल्याबद्दल आंदोलकांनी अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले. स्थानिकांनी केलेल्या या अनोख्या निषेधानं महापालिका प्रशासनाला सणसणीत चपराक बसली आहे.
वसईच्या बेनापट्टी हिंदू स्मशानभूमीत पालिका प्रशासनानं खेळांची साधनं, जिमचं साहित्य आणलेलं आहे. साधी गोष्ट आहे की, स्मशानभूमीत कोणीही खेळायला, बागडायला जात नाही. असं असताना मग हा खर्च नेमका कोणासाठी असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे. हा प्रकार म्हणजे पराकोटीचा असंवेदनशीलपणा असल्याच्या भावना स्थानिकांनी व्यक्त केल्या. योग्य ठिकाणी खर्च करायचा सोडून स्मशानभूमीत खेळण्यांवर खर्च कशासाठी, असा प्रश्न जागरुक नागरिकांनी विचारला.
काही स्थानिक भुतांचा वेष परिधान करुन, प्रशासनाचा निषेध म्हणून पालिकेच्या कार्यालयात गेले. तिथे जाऊन त्यांनी त्याच वेशात अधिकाऱ्यांचे आभार मानले. पुष्पगुच्छ देऊन त्यांना खोचकपणे धन्यवाद दिले. स्थानिकांनी त्यांच्या अनोख्या निषेध आंदोलनातून, स्मशानभूमीत खेळाचं साहित्य लावण्यामागील हेतू काय, असा प्रश्न विचारला. विशेष म्हणजे स्मशानभूमीपासून जवळच एक मैदान आहे. तिथे मुलं खेळतात. पण हे मैदान सोडून स्मशानभूमीत असले प्रकार करायची कल्पना कोणाच्या सुपीक डोक्याची उपज आहे? असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला.