डीडी न्यूज क्रीडा प्रतिनिधी
दि. ०५ ऑगस्ट २०२५
भारत-इंग्लंड कसोटीच्या निर्णायक क्षणी, जेव्हा सामना दोन्ही संघांसाठी तितकाच कठीण होता, तेव्हा मैदानावर एक अनपेक्षित दृश्य पाहायला मिळालं – मोहम्मद सिराज थेट कर्णधार शुभमन गिलशी भिडला!
घटना घडली ८४व्या षटकात, जेव्हा इंग्लंडची अखेरची जोडी खेळत होती. स्ट्राइकवर होता गस अॅटकिन्सन, आणि नॉन-स्ट्राइकवर दुखापतग्रस्त पण धाव घेण्यास तयार ख्रिस वोक्स. सिराजने एक रणनीती आखली होती – जर अॅटकिन्सनने चेंडू मिस केला, तर विकेटकीपर ध्रुव जुरेल एक ग्लोव्ह्ज काढून उभा राहिला पाहिजे, म्हणजे स्टम्पिंग सहज करता येईल.
सिराजने ही गोष्ट गिलला सांगितली आणि जुरेलपर्यंत पोचवण्याची विनंती केली. पण पुढच्याच क्षणी सिराजने रन-अप सुरू केला आणि गिलकडून संदेश पोहोचला नाही.
नेमकं तसंच घडलं – चेंडू अॅटकिन्सनने चुकवला, तो जुरेलकडे गेला, वोक्स धावला… पण जुरेलने ग्लोव्ह्ज काढले नव्हते आणि स्टम्पिंगचा सुवर्णसंधी हुकली!
यावर चिडून सिराज गिलवर भडकला – “मी तुला सांगितलं होतं, पण तू ऐकलं नाहीस!” गिल गप्प, फक्त पाहात राहिला.
सामना संपल्यावर गिलने स्पष्ट केलं –
“मी जुरेलकडे जायच्या आधीच सिराजने रन-अप सुरू केला होता, त्यामुळे जुरेलला सांगता आलं नाही.”
जरी ही घटना एका क्षणाची होती, तरी ती निर्णायक ठरू शकली असती. मात्र, अखेर भारताने सामना जिंकला आणि ती क्षणिक विसंगती इतिहासाच्या सावलीत हरवून गेली.