मुंबई प्रतिनिधी :
दि. ०७ ऑगस्ट २०२५
चित्रपटसृष्टीतून चर्चेत आलेली अभिनेत्री श्वेता मेनन सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आर्थिक फायद्यासाठी अश्लील चित्रपट आणि जाहिरातींमध्ये काम केल्याचा गंभीर आरोप तिच्यावर करण्यात आला असून, पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एर्नाकुलम सीजेएम न्यायालयाने पोलिसांना याप्रकरणी तपासाचे आदेश दिले आहेत.
तक्रारकर्ते मार्टिन मेनाचेरी यांनी श्वेता मेननविरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, अभिनेत्रीने अश्लील दृश्ये असलेले चित्रपट आणि जाहिराती केवळ आर्थिक फायद्यासाठी केल्या आणि हा कंटेंट सोशल मीडियावर तसेच काही अश्लील वेबसाइट्सवर अपलोड करण्यात आला.
पोलिसांनी ही तक्रार संज्ञानात घेत श्वेता मेननविरोधात अश्लीलता निवारण अधिनियम आणि आयटी कायदा यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक FIR मध्ये म्हटले आहे की, तिच्या भूमिकांमुळे समाजावर नकारात्मक परिणाम होतोय.
तक्रारीत ‘पलेरीमानिक्यम’ आणि ‘कलिमन्नू’ या चित्रपटांतील तिच्या भूमिका ही अश्लीलतेच्या स्वरूपात सादर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
श्वेता मेनन कोण आहे?
श्वेता मेनन ही एक प्रसिद्ध अभिनेत्री, टीव्ही अँकर आणि मॉडेल आहे. तिचा जन्म २३ एप्रिल १९७४ रोजी चंदीगडमध्ये झाला. १९९४ साली **’मिस इंडिया एशिया पॅसिफिक’**चा किताब जिंकत तिने ग्लॅमर विश्वात प्रवेश केला. मॉडेलिंगनंतर तिने मल्याळम सिनेमातून अभिनय कारकिर्द सुरू केली आणि नंतर हिंदी व साऊथच्या अनेक चित्रपटांत झळकली.
तिने सलमान खानसोबतही काम केलं आहे. ‘बंधन’ या चित्रपटात तिने सलमान खानच्या बहिणीची भूमिका साकारली होती.
सध्या तिच्यावर सुरु असलेला खटला तिच्या करिअरवर आणि प्रतिमेवर मोठा परिणाम करू शकतो, अशी चर्चा चित्रपटसृष्टीत सुरू आहे. पुढील तपासानंतरच खरा दोषी कोण हे स्पष्ट होईल.