पुणे प्रतिनिधी :
दि. ११ ऑगस्ट २०२५
पुण्यातील विवाहिता स्नेहा झंडगे हिने ९ ऑगस्ट रोजी आत्महत्या केल्याच्या प्रकरणात नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. स्नेहाच्या वडिलांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप करताना तिच्यावर दीर्घकाळ मानसिक व शारीरिक छळ झाल्याचे सांगितले आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, स्नेहाचे लग्न मोठ्या थाटामाटात करूनही झंडगे कुटुंब समाधानी नव्हते. सुरुवातीला मोहोळ येथे शेतजमीन घेण्यासाठी स्नेहाच्या माहेरकडून ५ लाख रुपये दिले गेले. काही काळ तिथे राहिल्यानंतर ते पुण्यात स्थलांतरित झाले, मात्र स्नेहाचा अचूक पत्ता माहेरच्या मंडळींना दिला गेला नाही.
स्नेहाला वारंवार पैशांची मागणी होत राहिली. पुढे कंपनी सुरू करण्यासाठी सासरकडून तब्बल २० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. रक्षाबंधनाला भावाला बोलावून येताना हे पैसे आणायला सांगण्याचा दबाव स्नेहावर टाकला जात होता. भावाने कंपनीत जाऊन बहिणीची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता, त्याला अपमानित करून हाकलण्यात आले, असेही उघड झाले आहे.
स्वयंपाक येत नाही, या कारणावरून स्नेहाचा छळ केला जात असल्याची तक्रार तिने पोलीस ठाण्यात दिली होती, मात्र सासऱ्याच्या दबावाखाली ती तक्रार मागे घेण्यात आली. अखेर वाढत्या त्रासाला कंटाळून, रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी घरात कोणी नसताना स्नेहाने आपले जीवन संपवले.
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पती विशाल झंडगे, सासरे संजय झंडगे, सासू विठाबाई झंडगे, दीर विनायक झंडगे, नणंद तेजश्री थिटे, नणंदेचा पती परमेश्वर थिटे आणि सासऱ्याचा साडू भाऊसाहेब कोल्हाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.