नवी दिल्ली प्रतिनिधी :
दि. १९ ऑगस्ट २०२५
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदारयाद्यांबाबत केलेल्या आरोपानंतर केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडलेली भूमिका आता वादग्रस्त ठरत आहे. त्यांच्या वक्तव्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी जोरदार प्रतिहल्ला चढवला आहे.
संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत निवडणूक आयुक्तांवर टीका करत, “राहुल गांधींनी शपथपत्र द्यावं किंवा देशाची माफी मागावी, ही मागणी म्हणजे सरळ मग्रुरी आहे. संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून हा अहंकार अपेक्षित नाही. तुम्ही शपथपत्र कोणाकडे मागताय? राहुल गांधींकडे? असं असेल तर या देशाची ८० कोटी जनता शपथपत्र द्यायला तयार आहे,” असे घणाघाती वक्तव्य केलं.
ते पुढे म्हणाले, “भाजपचे नेते अनुराग ठाकूर यांनी देखील मतदारयाद्यांमध्ये घोळ झाल्याचा आरोप केला होता. मग निवडणूक आयुक्तांनी त्यांच्याकडे शपथपत्र मागण्याची हिंमत दाखवली का? फक्त राहुल गांधींना लक्ष्य करणं हा पक्षपातीपणाच आहे.”
राऊत यांनी निवडणूक आयोगावर थेट भाजपाच्या हिताचे रक्षण केल्याचा आरोप करत, राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या कोणत्याही मुद्द्याला आयुक्तांनी ठोस उत्तर दिलेले नाही, असंही म्हटलं.
निवडणूक आयुक्तांचं काय म्हणणं होतं?
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की, बिहारमध्ये मतदारयाद्यांची विशेष पडताळणी (एसआयआर) सुरू आहे आणि त्याबाबत काही राजकीय पक्ष अपप्रचार करत आहेत. “मतचोरी आणि दुबार मतदानाचे आरोप निराधार आहेत. अशा निराधार आरोपांपाना निवडणूक आयोग घाबरत नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
तसंच, वगळलेल्या मतदारांची नावे जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रकाशित करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली.